सध्या संपूर्ण देशाला करोना विषाणूने विळखा घातलेला आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांना या विषाणूमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र या खडतर परिस्थितीतही काही रुग्ण वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांच्या सहकार्याने या विषाणूवर मात करत आहेत. यात ९० वर्षांच्या म्हाताऱ्या व्यक्तीपासून ते ९ दिवसांच्या लहानग्या मुलांचाही समावेश आहे. मध्य प्रदेशात अशीच एक आशादायी घटना समोर आली आहे. ७ एप्रिल रोजी भोपाळ शहरात जन्म झालेल्या एका मुलीला करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं, मात्र वेळेतच घेतलेली काळजी आणि योग्य उपचारांमुळे या मुलीने करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

करोनासारख्या जिवघेण्या विषाणूशी यशस्वी लढाई करत घरी आलेल्या आपल्या मुलीचं नाव आई-वडिलांनी प्रकृती असं ठेवलं आहे. ७ एप्रिल रोजी प्रकृतीचा जन्म झाल्यानंतर मुलगी व आईला ११ तारखेला रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला. मात्र याच रुग्णालयात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याची बातमी प्रकृतीच्या आई-वडिलांना समजली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या लहान मुलीची करोना चाचणी करण्याचा निर्णय आई-वडिलांनी घेतला. चाचणी करताना प्रकृती अवघ्या ९ दिवसांची होती. १९ तारखेला आलेल्या अहवालात लहानग्या प्रकृतीला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे परिवारातील अन्य कोणत्याही व्यक्तीला करोनाची लागण झाली नाही. यानंतर प्रकृती व तिच्या आईला खासगी रुग्णालयात १५ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आलं. ज्यात दोघांच्या प्रकृतीची योग्य काळजी व औषधोपचार केल्यानंतर लहानग्या प्रकृतीने करोनावर मात केल्याचं निष्पन्न झालं.