मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस दिसून आली. अवघ्या ७ जागा कमी पडल्या आणि भाजपाला १०९ वरच थांबावे लागले. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांना चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होता आले नाही. विशेष म्हणजे भाजपाला या ७ जागांवर जर ४३३७ मते मिळाली असतील तर ते बहुमताचा आकडा (११६) सहज पार करु शकले असते.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता लक्षात येईल की भाजपा फक्त ४३३७ मतांनी पिछाडीवर राहिली. ज्या ७ जागांवर भाजपाचे नुकसान झाले आहे. तेथील पराभवाचे अंतर हे १००० मतांपेक्षा कमी राहिले आहे. मध्य प्रदेश निवडणुकीत बहुमतासाठी ११६ जागांची गरज होती. भाजपाला १०९ जागा मिळाल्या. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये १० जागा अशा होत्या जिथे विजयाचे अंतर हे हजारांपेक्षाही कमी होते. यामध्ये काँग्रेसला ७ तर भाजपाला ३ जागा मिळाल्या.
मतदारसंघ मतांचा फरक विजेता
ग्वाल्हेर दक्षिण १२१ काँग्रेस
सुवासरा ३५० काँग्रेस
जबलपूर उत्तर ५७८ काँग्रेस</p>
राजनगर ७३२ काँग्रेस
दमोह ७९८ काँग्रेस
ब्यावरा ८२६ काँग्रेस
राजपूर ९३२ काँग्रेस
बीना ६३२ भाजपा
जावरा ५११ भाजपा
कोलारस ७२० भाजपा
एकूण भाजपाला ४३३७ मते जास्त मिळाली असती तर भाजपा या सर्व ७ जागांवर विजयी ठरले असते. या ७ मतदारसंघापैकी सर्वांत कमी अंतर हे ग्वाल्हेर दक्षिण या मतदारसंघात राहिले. येथील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पाठक यांनी भाजपाचे नारायणसिंह कुशवाह यांना अवघ्या १२१ मतांनी पराभूत केले. तर मालवा येथील मंदसौर जिल्ह्यातील सुवासरा मतदारसंघात काँग्रेसचे दंग हरिदपसिंह यांनी भाजपाचे राधेश्याम नानालाल पाटीदार यांचा ३५० मतांनी पराभव केला.
मतांच्या टक्केवारीत भाजपा आघाडीवर आहे. भाजपाला राज्यात ४१ टक्के मते मिळाली तर काँग्रेसला ४०.० टक्के मते मिळालीत. भाजपाला १ कोटी ५६ लाख ४२ हजार ९८० मते तर काँग्रेसला १ कोटी ५५ लाख ९५ हजार १५३ मते मिळाली.
मागील निवडणुकीत भाजपाने १६५ जागा मिळवून पूर्ण बहुमत मिळवले होते. तर काँग्रेसला अवघ्या ५८ जागा मिळाल्या होत्या. २०१३ च्या निवडणुकीत भाजपाला ४४.८८ टक्के मते तर काँग्रेसला ३६.३८ टक्के मते मिळाली होती. यावेळी भाजपाच्या मतांच्या टक्केवारी घट झाली आहे.