सर्वाधिक काळ विना मंत्रिमंडळ सरकार चालवणारे मुख्यमंत्री हा रेकॉर्ड मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या नावावर झाला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारला आता २६ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाची स्थापना करता आली नव्हती.
यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस युडियुरप्पा यांनी २५ दिवस मंत्रिमंडळाविना सरकार चालवलं होतं आणि २६ व्या दिवशी मंत्रिमंडळाची स्थापना केली होती. दरम्यान, देशभरात तसंच मध्य प्रदेशात सुरू असलेल्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवराज सिंग चौहान यांना मंत्रिमंडळाची स्थापना करता आली नाही. तसंच कोणत्याही मंत्रिमंडळाशिवाय सरकार चालवणारे ते देशातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
काँग्रेसच्या २२ बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आलं होतं. त्यानंतर शिवराज सिंग चौहान यांनी २३ मार्च रोजी संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर २४ मार्च रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर केलं होतं. त्यामुळे शिवराज सिंग चौहान यांना मंत्रिमंडळाची स्थापना करता आली नव्हती. दरम्यान १४ एप्रिल रोजी लॉकडाउननंतर ते मंत्रिमंडळाची स्थापना करतील अशा चर्चा सुरू होत्या. परंतु आता लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता ते मंत्रिमंडळाची स्थापना कधी करतील हे पाहावं लागणार आहे.