मद्रास उच्च न्यायालय
नवऱ्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करणाऱ्या स्त्रीला पहिल्या लग्नबंधनातून झालेल्या अपत्याचा ताबा घेण्यापासून प्रतिबंध करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सासूच्या ताब्यात असलेल्या मुलीचा ताबा आता संबंधित मातेला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुभा यांनी यासंदर्भात न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. मुलगी काव्यश्री हिला न्यायालयात हजर करावे, अशी त्यांची मागणी होती. पहिला नवरा मरण पावल्यानंतर त्यांनी आणखी एक लग्न केले. न्यायमूर्ती एस. तामिलवनन आणि न्यायमूर्ती सी. टी. सेल्वम यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न करणे गैर अथवा बेकायदेशीर नाही. त्यामुळे पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीचा ताबा मिळण्यासाठी सुभा यांनी केलेली याचिका कायदेशीरच आहे. तसेच, त्यांना ताबा घेण्यापासून कायदेशीररीत्या प्रतिबंधही करता येणार नाही. कारण त्याच तिच्या नैसर्गिक पालक आहेत. तसेच केवळ दुसरे लग्न केले आहे म्हणून त्या अपत्याचा सांभाळ करण्यास अक्षम आहेत, असेही म्हणता येणार नाहीत.
सुभा यांच्या सासू कलियाम्मल यांना न्यायालयाने काव्यश्रीचा ताबा सुनेकडे देण्याचे आदेश दिले. सप्टेंबर २०१०मध्ये सुभा यांनी मेनन बाबू यांच्याशी लग्न केले. या लग्नबंधनातून त्यांना काव्यश्री हे अपत्य झाले. जून २०१३मध्ये पतीने आत्महत्या केल्यानंतर त्या आपल्या वडिलांकडेच राहत होत्या. या वर्षी फेब्रुवारीत त्यांनी सुसिंद्रन यांच्याशी लग्न केले. २५ फेब्रुवारी रोजी शाळेतून घरी परतणाऱ्या काव्यश्रीचे कलियाम्मल व इतरांनी अपहरण केले. सुभा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करूनही याबाबत कसलीही पावले उचलण्यात आली नव्हती.