मध्य प्रदेशला केंद्राकडून पुरवठा

भोपाळ : देशात बहुतेक सर्वच राज्यांत ऑक्सिजनचा तुटवडा असतानाच केंद्र सरकार मध्य प्रदेशला रोज ५० टन ऑक्सिजनचा पुरवठा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. महाराष्ट्रातील प्रकल्पातून मध्य प्रदेशला ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता, त्यामुळे मध्य प्रदेशने केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी केली होती.

चौहान यांनी सांगितले, की आपण सरकारला रोज ५० टन ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली होती, त्यांनी ती मान्य केली असून आता रोज  १८० टन ऑक्सिजन मध्यप्रदेशला उपलब्ध होणार आहे.

नागपूर येथील आयनॉक्स कंपनी मध्य प्रदेशला ऑक्सिजनचा पुरवठा करीत होती, पण तो अचानक बंद करण्यात आला आहे, त्यामुळे मध्य प्रदेशला केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी करावी लागली. चौहान यांनी सांगितले,की आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत  बोललो होतो व त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे मान्य केले होते. नियोजनाचा भाग म्हणून महाराष्ट्रातील आयनॉक्स कंपनीला मध्य प्रदेशात होशंगाबाद येथे बाबाई नजीक मोहसा गावात दोनशे टनांचा ऑक्सिजन प्रकल्प सहा महिन्यात सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.