मालदीवमधील चीनचा वाढता हस्तक्षेप आणि त्या देशात चीनने जमीन बळकावल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. मालदीवमधल्या चीनच्या वाढत्या प्रभावाची अमेरिकेने गंभीर दखल घेतली आहे.

स्वतंत्र आणि खुल्या इंडिया-पॅसिफिकच्या नियमांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे अमेरिकेने म्हटले आहे. मालदीववरील चीनचा प्रभाव आणि तिथल्या घडामोडी चिंता वाढवणाऱ्या आहेत असे पेंटॉगानचे वरिष्ठ अधिकारी जोई फेल्टर यांनी म्हटले आहे.

मालदीवमध्ये घडणाऱ्या घडामोडी भारताच्या दृष्टीने सुद्धा चिंताजनक आहेत याची आम्हाला कल्पना आहे. मालदीवचा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा असून त्याचा कसा सामना करायचा ते लवकरच ठरवू असे पेंटागॉनने स्पष्ट केले आहे.

मालदीवमध्ये लष्करी तळ उभा करण्यासाठी चीन तिथे जमीन बळकावत चालला आहे असा आरोप मालदीवचे विरोधी पक्षनेते आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी केला होता. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फेल्टर यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. या घडामोडी कायद्या आणि नियमानुसार राज्य, देश चालवण्याचे समर्थन करणाऱ्या सर्वच देशांसाठी चिंता वाढवणाऱ्या आहेत असे फेल्टर यांनी म्हटले आहे.