मालेगाव स्फोटातील आरोपी आणि भोपाळमधून भाजपा खासदार असणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत स्थान देण्यात आलं आहे. या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समितीचे प्रमुख आहेत. वादग्रस्त असणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांना समितीत सहभागी केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२१ सदस्यांच्या समितीत शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला
संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत २१ सदस्यांना स्थान देण्यात आलं आहे. भाजपाच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यासहित यामध्ये विरोधी पक्षातील प्रमुख चेहऱ्यांना जागा देण्यात आली आहे. विरोधी पक्षातील खासदारांपैकी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे. मात्र प्रज्ञा ठाकूर यांना समितीत घेतल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भोपालमधून लोकसभा खासदार आहेत प्रज्ञा ठाकूर
प्रज्ञा ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा पराभव करत निवडणूक जिंकली होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान, नथुराम गोडसेसंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.