पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून मतभेद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी बॅनर्जी यांच्या कार्यालयाकडून त्याला कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचे धनखार यांनी म्हटले आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या नियमित संपर्कात असले पाहिजे, असे धनखार यांनी म्हटले आहे. बॅनर्जी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आपल्याला अद्यापही आशा आहे, असेही धनखार यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी ठरवतील त्या ठिकाणी, त्या दिवशी आणि त्या वेळेला आपण चर्चेस तयार आहोत, असे धनखार यांनी जाहीर केले होते, मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही, तरीही त्या सकारात्मक विचार करतील, अशी आशा राज्यपालांनी ट्वीटद्वारे व्यक्त केली आहे.