मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील विनोबा नगर भागात सर्वे करण्यासाठी आलेल्या आरोग्य अधिकाऱ्यावर एका व्यक्तीचे चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इंदूर शहरात आरोग्य विभागाचे अधिकारी आणि डॉक्टर घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचं काम करत आहेत. शनिवारी एका व्यक्तीने सर्वे करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यावर हल्ला केला आहे…India Today ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

हल्ला करणाऱ्या व्यक्तीने सर्वे करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनाही मारहाण केली, इतकच नव्हे तर हा प्रकार पाहून शेजारी राहणाऱ्या व्यक्ती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या रक्षणासाठी पुढे आल्या. यावेळी या व्यक्तीने आपल्या चाकूने शेजारच्यांवरही हल्ला केला आहे. या व्यक्तीने सर्वे करणाऱ्या महिला शिक्षिकेवरही हात उचलत तिचा फोन तोडला. सर्वेचं काम पाहणारे प्रमुख डॉक्टर प्रवीण चौरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकारामुळे विनोबा नगर भागात तणावाचं वातावरण निर्माण होतं. दरम्यान या घटनेत सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचं वृत्त अद्याप आलेलं नाही.