उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका इसमाला रुग्णालय प्रशासनाच्या संवेदनशून्य काराभारामुळे आपल्या पत्नीचा मृतदेह चक्क सायकलवरुन घेऊन जावा लागला. रुग्णालय प्रशासनाने मयत महिला रुग्णाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका न दिल्याने पतीनेच पत्नीचा मृतदेह सायकलवरुन ४५ किलोमीटर दूर असणाऱ्या आपल्या मूळ गावी न्यावा लागला.

प्रयागराज येथील स्वरुप राणी नेहरु रुग्णालयामध्ये कल्लू नावाच्या इसमाने त्याची पत्नी सोना देवी हिला उपचारांसाठी दाखल केले होते. डोक्याला दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कल्लूच्या पत्नीवर उपचार सुरु होते. मात्र अचानक तिची प्रकृती खालावली आणि त्यातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर कल्लूने रुग्णालय प्रशासनाकडे मृतदेह मूळ गावी म्हणजेच शंकरघर येथे घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका देण्याची विनंती केली. मात्र कल्लूची ही विनंती रुग्णालय प्रशासनाने मान्य केली नाही. त्यामुळे कल्लूला आपल्या पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये गुंडाळून सायकलवरुनच न्यावा लागला.

संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर बारा विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी इंद्रभान तिवारी यांनी कल्लू यांच्या घराला भेट दिली. कल्लूला त्याच्या पत्नीवर अंत्यसंस्कार करता यावे यासाठी इंद्रभान यांनी दोन हजारांची आर्थिक मदतही केली. तसेच यापुढे कल्लूच्या कुटुंबाला सर्व सरकारी योजनांचा फायदा मिळवून दिला जाईल असंही यावेळी इंद्रभान यांनी स्पष्ट केले. याप्रकरणामध्ये दोषी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी दिले आहे. या प्रकरणात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी ए.के. श्रीवास्तव यांना चौकशी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.

कल्लू यांची पत्नी सोना देवी यांच्याबद्दल रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. तसेच सोना देवींचे डेथ सर्टिफिकेटही रुग्णालयाने जारी केलेले नाही असंही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.