कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा मुलगा राघवेंद्र यांच्या गाडीने एका पादचाऱ्याला धडक दिली. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी राघवेंद्र गाडीमधून प्रवास करत होते. मध्य कर्नाटकमधील दावांगेरे येथील होन्नळीत गुरुवारी रात्री हा अपघात झाला. राघवेंद्र भाजपचे आमदार आहेत.
शिखरीपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असलेले राघवेंद्र गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास बंगळुरुहून शिखरीपुराला परतत होते. यावेळी त्यांच्या गाडीने २४ वर्षीय सुरेश यांना धडक दिली. त्यात सुरेश यांचा जागीच मृत्यू झाला. राघवेंद्र यांच्या वाहनाच्या धडकेत मृत पावलेला सुरेश मादापोराचे रहिवासी असल्याची माहिती पुढे येत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी राघवेंद्र यांचे वाहन चालक रवीकुमारला अटक केली आहे. पोलिसांनी रवीकुमारवर बेजबाबदारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात राघवेंद्र यांनी आवश्यक असलेली सर्व माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘अपघातात मृत पावलेल्या सुरेशने रिक्षाच्या बाहेर उडी मारली. त्याचवेळी माझी गाडी तिथून जात होती,’ अशी माहिती राघवेंद्र यांनी पोलिसांना दिली. अपघातावेळी सुरेश मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोपदेखील राघवेंद्र यांनी केला. मात्र पोलिसांनी याबद्दल अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. राघवेंद्र यांचे वडिल येडियुरप्पा कर्नाटक भाजपचे अध्यक्ष आहेत.