प्रेमविवाह केल्यामुळे आणखी एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला आहे. एका २५ वर्षीय तरुणाची त्याच्या सासरच्या मंडळींनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा तरुण गुजरातच्या बोटाद जिल्ह्यातील लिंबली गावचा रहिवासी होता. तरुणाने आणि त्याच्या पत्नीने चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, त्याच्या सासरच्या मंडळींचा या विवाहाला विरोध होता. त्याच रागातून त्यांनी तरुणाची हत्या केली आहे. जयसुख असं मृत तरुणाचं नाव आहे. या तरुणाचा मृतदेह त्याच्या गावापासून १५ किलोमीटर दूर आढळला होता. पोलिसांना मृतदेहावर जखमा आढळल्या असून त्याचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता, असं पोलिसांनी सांगितलं.
जयसुखच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तो जयसुखला त्याच्या गावी सोडायला जात होता. यावेळी रस्त्यावर त्याच्या सासरचे लोक पाळत ठेवून बसले होते. आम्ही दिसताच त्यांनी आमच्यावर काठ्यांनी आणि पाईपने हल्ला केला. त्यानंतर जबरदस्तीने ते जयसुखला कारमध्ये बसवून घेऊन गेले. आरोपींमध्ये जयसुखच्या पत्नीचा भाऊ, तिचे नातेवाईक आणि एक अनोळखी व्यक्ती असल्याचं जयसुखच्या मित्राने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. आरोपी सर्वजण हे अमरेली जिल्ह्यातील नानी कुंडल गावचे रहिवाशी असून घटना घडल्यानंतर ते फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. जयसुख आणि त्याच्या पत्नीने ४ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मुलीचे कुटुंबीय या लग्नामुळे खुश नव्हते, त्यामुळे हे दोघं लिंबली गावात राहायला आले होते.
दरम्यान, “या प्रकरणी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच लग्नाच्या तब्बल ४ वर्षांनी आरोपींनी जयसुखवर हल्ला का केला, याचा तपास आम्ही करतोय”, असं पोलिसांनी सांगितलं.