मृत्युचा अनुभव घेण्याच्या प्रयत्नात एका तरुणानं जीव गमावल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विष प्राशन करून तरुणानं आत्महत्येचा हा सर्व प्रकार सोशल मीडिया अॅपवर रेकॉर्ड केला. कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यात ही घटना घडली असून, नको त्या धाडसापायी २४ तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कुमाकुरू जिल्ह्यातील गौरागनाहल्ली गावातील रहिवाशी असलेल्या धनंजय या २४ वर्षीय तरुणाला मृत्यूचा अनुभव घ्यायचा होता. तसं तो नेहमी बोलून दाखवत होता. रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या धनंजयला आईनं काहीच कमाई करत नसल्यानं फटकारलं होतं. त्यानंतर धनंजयनं कीटकनाशकाची बाटली विकत घेतली. त्यानंतर एक छोटा व्हिडीओ रेकॉर्ड केला. “आपल्याला मृत्युचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्यामुळे स्वतःला मारण्याचा प्रयत्न करतोय,” असं धनंजयनं या व्हिडीओत म्हटलं आहे.

“धनंजयनं विष प्राशन केलं. त्यानंतर आपलाला मृत्यू होणार असल्याच्या भीतीनं तो घाबरला. तो घरी आला आणि मित्राला फोन केला. मित्रानं शनिवारी रात्री धनंजयला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात उपचार सुरू असताना धनंजयचा मृत्यू झाला,” असं पोलिसांनी म्हटलं आहे.

धनंजय रिक्षा चालवायचा. चार महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. लॉकडाउनमुळे त्याचं उत्पन्न थांबल होतं. त्यामुळे तो मानसिक त्रासात होता, असा दावा गावातील ग्रामस्थांनी केला. धनंजयनं मृत्यूचा अनुभव घेण्यासाठी यापूर्वीही जीवघेणा प्रकार केला होता. काही दिवसांपूर्वी त्यानं मोटारसायकलनं एका झाडाला धडक दिली होती. या अपघातात तो बचावला होता. मात्र, तो गंभीर जखमीही झाला होता. त्यावेळी त्याच्या आईवडिलांनीही त्याला समजावलं होतं. या घटनेप्रकरणी पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.