लॉकडाउनमुळे देशातल्या सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाउनमुळे दुसऱ्या शहरांमध्ये काम करणारे कामगार आपल्या परिवारापासून दूर अडकून पडले आहेत. केरळच्या ३० वर्षीय एका व्यक्तीने आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी अशी युक्ती वापरली आहे की सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या दिनूप नावाच्या एका व्यक्तीने आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी एका बसची चोरी केली. लॉकडाउन लावलेला असताना देखील दिनूपने कुटुंबाची भेट घेण्यासाठी चार जिल्ह्याच्या सीमा ओलांडल्या आणि आपल्या जिल्ह्यात पोहोचला. मात्र घरी पोहोचण्या आधीच पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याचा हा प्रयत्न फसला. दिनूपने कोझिकोडच्या बसस्थानकावर उभी असलेली एक खाजगी बस शनिवारी चोरली. त्यानंतर रात्रभर बस चालवत राहिला. रविवारी सकाळी पोलिसांनी त्या अडवले आणि चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक करुन चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

पथनमथिट्टा जिल्ह्याच्या तिरुवल्लामध्ये राहत असलेल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी आपण जात असल्याचे दिनूपने पोलिसांना सांगितले. लॉकडाउनमुळे कोझिकोडवरुन २७० किलोमीटर लांब असलेल्या तिरुवला येथे पोहोचता येत नव्हते. त्याला कुट्टियाडी पोलीस स्टेशन परिसरात एक खाजगी बस दिसली. ज्यामध्ये कोणी नव्हते. त्यानंतर दिनूप बसमध्ये घुसला आणि कशी तरी बस सुरू केली. बसमध्ये डिझेल पूर्णपणे भरले होते. त्यामुळे तो तिरुवल्ला येथे जाण्यासाठी निघाला. रात्री दोनवेळा पोलिसांना त्याला थांबवले होते. त्यावेळी त्याने प्रवासी कामगारांना आणण्यासाठी पथनमथिट्टा येथे जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला तेथून जाऊ दिले.

दिनूपने मल्लापूरम, त्रिसूर, एर्नाकुलम हे जिल्हे पार करुन कोट्ट्याम जिल्ह्यात प्रवेश केला. येथे त्याला पोलिसांनी अटक केली. कुमाराकोम येथे जेव्हा पोलिसांना त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना मागितला तेव्हा त्याचं खोटं पकडलं गेलं. त्यानंतर पोलिसांनी बसच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून बसच्या मालकाशी संपर्क साधला.