प्रवासादरम्यान एका प्रवाश्याचा मृत्यू झाल्याने बसच्या कंडक्टरने चक्क तो मृतदेह हायवेवर बसमधून खाली उतरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. द न्यूज मिनीट या वेबसाईटने या घटनेसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकार तामिळनाडूमधील हैसूर जवळ घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुळचे तामिळनाडूचे असणारे ४३ वर्षीय राधाकृष्णन आणि त्यांचा ५४ वर्षीय मित्र विरन हे दोघे बंगळुरुच्या दिशेने प्रवास करत होते. त्यावेळी बस सुलागीरी येथे असताना विरन यांचा बसल्या जागीच मृत्यू झाला. अशावेळी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्याऐवजी बसच्या कंडक्टरने या प्रकरणात अडकायला नको म्हणून राधाकृष्णन यांना विरन यांच्या मृतदेहासहीत हायवेवर मध्येच बसखाली उतरवले. जेव्हा विरन मेल्याचे समजले तेव्हा कंडक्टरने लगेच बस रस्त्याच्याकडेला घेत आम्हाला बसमधून खाली उतरवल्याने राधाकृष्णन यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे. त्यानंतर राधाकृष्णन काही तास त्या रस्त्यावर विरन यांच्या मृतदेहापाशी एखादी गाडी थांबण्याची वाट पाहत उभे होते.

कंडक्टरने केवळ या दोघांना बसमधून उतरवलेच नाही तर त्यांना प्रवास पूर्ण होण्याआधी उतरल्यानंतर त्यांच्या तिकीटांचे पैसेही परत केले नाहीत. तिकीटासाठी दिलेले १५० रुपये राधाकृष्णन यांनी मागितल्यानंतर मेलेली व्यक्ती तिकीटांच्या पैश्याचे काय करणार असा उलट प्रश्न करत तो कंडक्टर निघून गेला.

दोन ते तीन तास वाट पाहिल्यानंतर राधाकृष्णन यांच्या मदतीला काही स्थानिक लोक धावून आले आणि त्यांनी विरन यांचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात नेला. अशी अमानुष वागणूक देणारा कंडक्टर आणि बस कोणती होती याबद्दलची कोणातीही माहिती हाती आलेली नाही.