पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेला डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाचा भाग काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. साहसवीर बेअर ग्रिल्सबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामधील घनदाट जंगलांमध्ये भटकताना दिसले. हा भाग प्रदर्शित झाल्यानंतर ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ शो एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोहचला असल्याचे बेअर गिल्सने ट्विटरद्वारे सांगितले आहे. शोने जगातील सर्वाधिक ट्रेंडिग शोचे स्थान पटकावले असून ३.६ बिलियन्स इम्प्रेशन मिळाल्याचे बेअरने सांगितले.

‘मॅन व्हर्सेस वाईल्ड हा शो अधिकृतपणे जगातील सर्वाधिक ट्रेंडिग टीव्ही शो ठरला आहे. या शोला ३.६ बिलियन्स इम्प्रेशन मिळाले आहे. सर्वांचे आभार’ असे गिल्सने ट्विटमध्ये लिहिले आहे.

‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग हा प्राणी संवर्धनाचा संदेश देण्यासाठी एक प्रयत्न आहे. “मी निसर्गामध्ये राहिलो आहे. डोंगरात, जंगलांमध्ये वास्तव्य केले आहे. तो जो काळ होता त्याने माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकला. त्यामुळे निसर्गामध्ये चित्रीत होणाऱ्या या विशेष भागाबद्दल जेव्हा मला विचारण्यात आले. त्यावेळी माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले आणि सहभागी होण्यासाठी मी तयार झालो” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

“मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमाच्या निमित्ताने मला भारतातील संपन्न, समृद्ध पर्यावरण जगाला दाखवण्याची संधी मिळाली. बेअरसोबत पुन्हा एकदा जंगलात वेळ घालवण्याची संधी मिळाली. खरोखर तो एक खूप सुंदर अनुभव होता” असे मोदींनी सांगितले. मोदींनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन का आवश्यक आहे? ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी या विशेष भागाचे चित्रिकरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर देशाच्या प्रमुखपदी असताना ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये सहभागी होणारे पंतप्रधान मोदी हे केवळ दुसरे नेते ठरले आहेत.