News Flash

ब्रिटनच्या रस्त्यावर लष्कर तैनात करणार

लिबियन वंशाचा अबेदी मँचेस्टर हल्ल्याचा सूत्रधार

| May 25, 2017 02:44 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

लिबियन वंशाचा अबेदी मँचेस्टर हल्ल्याचा सूत्रधार

मँचेस्टर येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी रस्त्यावर लष्कर दाखल करण्याची तयारी केली असून, दुसरा हल्ला अटळ असल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात बावीस वर्षांचा लिबियन वंशाचा अबेदी हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ब्रिटनमध्ये सतर्कतेची पातळी वाढवण्यात आली असून, मँचेस्टर येथील पॉप कॉन्सर्टमध्ये २२ ठार, तर ५८ जण जखमी झाले होते. गंभीरपासून अतिधोकादायक पातळीपर्यंत धोक्याच्या इशाऱ्याची तीव्रता वाढवण्यात आली असून, २००७ पासून प्रथमच धोक्याची पातळी एवढी ठेवली आहे. ब्रिटनमध्ये आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही धोक्याची पातळी जास्त ठेवली आहे. त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी लष्कराचे जवान तैनात केले जातील. थेरेसा मे यांनी सांगितले, की आणखी हल्ल्यांची शक्यता नाकारता येत नाही. मँचेस्टर येथील हल्ल्याशी अनेक जणांचा सहभाग असलेल्या गटाचा हात आहे. कोब्रा कमिटीच्या बैठकीनंतर त्यांनी देशाला उद्देशून थेट भाषण केले. सुरक्षा धोकापातळीत वाढ झाल्याने आता पोलिस व लष्कर तैनात करावे लागेल. संरक्षणमंत्र्यांनी आता लष्कराचे जवान तैनात करण्याची परवानगी द्यावी असे दहशतवाद विश्लेषण केंद्राने म्हटले आहे. ऑपरेशन टेंपरर मोहीम आखण्यात आली असून, त्यानुसार महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण लष्करी दलांकडे देण्यात येईल. ही मोहीम २०१५ मध्येही राबवण्यात आली होती. आता त्याच मोहिमेत ब्रिटनमधील रस्त्यांवर पाच हजार सैनिक तैनात केले जातील. संगीत मैफली, क्रीडा सामने या ठिकाणी लष्करी जवान तैनात केले जातील व ते पोलिसांना मदत करतील. हे लष्करी जवान पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत काम करतील. लोकांना अकारण भीतीच्या छायेत राहावे लागू नये, त्यामुळे आपण या उपाययोजना करीत आहोत असे मे यांनी सांगितले.

लिबियन वंशाचा अबेदी सूत्रधार

या हल्ल्यात बावीस वर्षांचा लिबियन वंशाचा अबेदी हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. अमेरिकी पॉप गायिका अरियाना ग्रांदे हिच्या मैफलीनंतर दहशतवादी हल्ला झाला होता. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून, असे आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. गुप्तचर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या वेळी ज्या यंत्राने स्फोट करण्यात आला ते अत्याधुनिक होते व अबेदी याला ते कसे उडवायचे व स्फोट कसा करायचा याचे प्रशिक्षण दिलेले असावे. एखाद्या तंत्रज्ञाने हा बॉम्ब बनवला असावा, पण तो अजून सापडलेला नाही. द्रव बॉम्बच्या मदतीने ट्रान्सअॅटलांटिकची विमाने उडवण्याची धमकी २००६ मध्ये देण्यात आली होती तेव्हा खूप मोठय़ा पातळीची सुरक्षा सतर्कता देण्यात आली होती. नंतर लंडन येथील नाइट क्लबमध्ये स्फोट करण्याच्या प्रयत्नातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अशीच सतर्कता देण्यात आली होती.

मँचेस्टर हल्ल्याच्या संबंधात आणखी तीन जणांना अटक

लंडन : २२ जणांचा बळी घेणाऱ्या मँचेस्टर कन्सर्ट दहशतवादी हल्ल्याच्या संबंधात बुधवारी ब्रिटनमध्ये आणखी तीन जणांना अटक करण्यात आली. यामुळे या प्रकरणी आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या चार झाली आहे.

लिबियन वंशाच्या सलमान अबेदी (२२) याने अरियाना ग्रांदे या पॉप गायिकेच्या कन्सर्टनंतर सोमवारी रात्री घडवलेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्याच्या संबंधात मंगळवारी २३ वर्षांच्या एका तरुणाला अटक करण्यात आली. हा तरुण अबेदीचा भाऊ इस्माईल असल्याचे वृत्त बीबीसीने दिले.

मँचेस्टर एरिनातील सोमवारी रात्रीच्या भीषण हल्ल्याच्या तपासाच्या संबंधात पोलिसांनी दक्षिण मँचेस्टरमध्ये वॉरंट बजावून तीन जणांना अटक केली आहे, असे ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी जारी केलेल्या एका निवेदनात सांगितले.

अबेदी हा सुरक्षा यंत्रणांना ‘एका मर्यादेपर्यंत’ माहीत होता आणि त्याच्या अल- कायदा आणि आयसिस या संघटनांशी असलेल्या संबंधांचा सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या पालकांच्या लिबया या मायदेशातून छडा लावला, असे ब्रिटनचे गृहसचिव अँबर रुड यांनी मंगळवारी म्हटले होते.

मँचेस्टरमध्ये जन्मलेला अबेदी तेथील शाळेत शिकल्यानंतर त्याने सॅल्फोर्ड विद्यापीठात व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. नंतर त्याने तो सोडून दिला. तो अनेकदा लिबयाला गेला होता. मुअम्मर गडाफीची सत्ता उलटून लावण्यात आल्यानंतर त्याचे पालक २०११ साली लिबयात परत आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 2:44 am

Web Title: manchester terror attack british army marathi articles
Next Stories
1 भारतीय महिलेस वाघा सीमेवर सोडण्याचा आदेश
2 ‘रामनाथ गोएंका स्मृती व्याख्यान उपक्रमा’त आज राष्ट्रपतींचे विचारमंथन
3 तिहेरी तलाकच्या मुद्याचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाच्या रिंगणात
Just Now!
X