आकाशवाणी अर्थात All India Radio मध्येही MeToo चे वादळ आले आहे. अनेक महिलांनी लैंगिक शोषण झाल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी माहिती प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांना पत्र लिहिले आहे.

आकाशवणीतील महिला सहकाऱ्यांनी जे आरोप केले आहेत त्याची सखोल चौकशी केली जावी. तसेच भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी एक काटेकोर व्यवस्था तयार करावी जेणेकरून कोणाही महिला कर्मचाऱ्याला असा अनुभव घ्यावा लागणार नाही असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आकाशवाणीत काम करणाऱ्या काही महिला कर्मचाऱ्यांनी आणि वृत्त निवेदकांनी लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवल्या आहेत ज्यानंतर हे पत्र मनेका गांधी यांनी लिहिले आहे.

MeToo ही चळवळ सुरु झाल्यानंतर आकाशवाणीतील महिला कर्मचारी आणि वृत्त निवेदकांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. यानंतर मनेका गांधी यांनी हे पत्र लिहिले आहे. देशभरात ऑल इंडिया रेडिओच्या कार्यालयातून या संदर्भातल्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेतली जाऊन त्यानंतर या संदर्भात कारवाई केली जावी म्हणून मनेका गांधी यांनी हे पत्र लिहिले आहे. आता यानंतर राज्यवर्धन राठोड हे काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.