पर्यावरण मंत्रालयाच्या निर्णयावर मनेका गांधींची टीका; कायद्यानुसार कृती- जावडेकर
प्राण्यांची कत्तल करण्याच्या प्रश्नावरून केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि प्रकाश जावडेकर यांच्यात जुंपली आहे. प्राण्यांची कत्तल करण्याची पर्यावरण मंत्रालयाची प्रवृत्तीच झाली आहे, असे मनेका गांधी यांनी म्हटले आहे.
पिकांचे रक्षण करण्यासाठी राज्यांच्या विनंतीवरून प्राण्यांची कत्तल करण्याची अनुमती देण्यात आली असून ती विशिष्ट परिसरापुरती आणि थोडय़ा कालावधीपुरती मर्यादित आहे, असे स्पष्टीकरण पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहे.
भाजपच्या दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये वाद निर्माण झाल्याची संधी साधून विरोधकांनी पंतप्रधान मोदी सरकारमध्ये संघभावना नसल्याची टीका केली आहे.
बिहारमध्ये गेल्या एका आठवडय़ात २०० नीलगायींची गोळ्या घालून कत्तल करण्यात आली ते सर्वात मोठे हत्याकांड होते, असे महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी म्हणाल्या. मनेका गांधी या प्राणी हक्क कार्यकर्त्यांही असल्याने त्या अधिक संतप्त झाल्या आहेत.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रत्येक राज्य सरकारला ज्या प्राण्यांची कत्तल करावयाची आहे त्यांची यादी देण्यास सांगितले आहे, तशी यादी मिळाल्यास केंद्र सरकार त्यासाठी परवानगी देणार आहे, असे मनेका गांधी म्हणाल्या.
हे प्रथमच होत आहे, प्राण्यांना मारण्याची ही प्रवृत्ती अनाकलनीय आहे, ही लज्जास्पद बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्राण्यांची कत्तल करण्याची इच्छा नाही असे राज्यांच्या वन्यजीव विभागांमार्फत सांगण्यात येत असले तरी बिहारमध्ये नीलगायींची, पश्चिम बंगालमध्ये हत्तींची, हिमाचल प्रदेशात माकडांची, गोव्यात मोरांची आणि चंद्रपूरमध्ये जंगली अस्वलांची हत्या करण्यास केंद्र सरकार अनुमती देत आहे, असे मनेका म्हणाल्या.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार त्यांच्याकडून आल्यास आणि राज्यांनी तसा प्रस्ताव दिल्यासच केंद्र सरकार प्राण्यांची कत्तल करण्याची परवानगी देते, असे जावडेकर म्हणाले.
ग्रामप्रमुख अथवा शेतकऱ्यांनी कोणतीही तक्रार केली नसतानाही बिहारमध्ये नीलगायींची कत्तल करण्यात आली.
-मनेका गांधी
ही कृती कायद्यानुसार करण्यात आली आहे.राज्यांनी तसा प्रस्ताव दिल्यासच केंद्र सरकार प्राण्यांची कत्तल करण्याची परवानगी देते,
– प्रकाश जावडेकर