नवी दिल्ली : भारताच्या मंगळ मोहिमेला चार वर्षे पूर्ण झाली असून भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(इस्रो) ही मोहीम कमी काळात यशस्वी केली होती. इस्रोने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी सोडलेले यान २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत स्थापित केले होते. मंगळयानाचा आयुष्यकाल सहा महिने होता पण गेली चार वर्षे हे यान मंगळावरून संदेश पाठवत आहे.

इस्रोच्या मार्स ऑर्बिटर ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, मंगळयानाला चार वर्षे झाली आहेत. यात मंगळावरील ऑलिंपस पर्वताची छायाचित्रे असून तो सौरमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी पर्वत आहे. मंगळयानाचा संपर्क  काही काळ तुटला होता पण नंतर तो परत प्रस्थापित करण्यात आला. नंतर त्यात काही अडचणी आल्या नाहीत. मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम) यानाची बांधणी भारतातच करण्यात आली होती.

एकाच फ्रेममध्ये मंगळाचा पूर्ण वेध घेणारे हे पहिलेच यान ठरले. मंगळाच्या एकदम टोकाला असलेल्या डिमॉस या नैसर्गिक उपग्रहाची छायाचित्रेही यानाने टिपली आहेत.

मंगळावर पाठवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने ९८० छायाचित्रे पाठवली होती. मंगळाचा संपूर्ण नकाशा तयार करण्यात ‘मॉम’ने यश मिळवले होते.

मंगळावर सूक्ष्मजीवांचे अस्तित्व

वॉशिंग्टन- प्राचीन काळात मंगळावरील पृष्ठभागाखाली सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असावे असे एका अभ्यासात दिसून आले आहे. पृथ्वीवरही एकेकाळी जे सूक्ष्मजीव होते त्यांना थेट सूर्यप्रकाश मिळत नव्हता त्यामुळ ेसब सरफेस लिथोट्रॉपिक मायक्रोबियल सिस्टीम्स हा सूक्षजीव समूह आजूबाजूच्या वातावरणातील रेणूंचे विघटन करून त्यांच्या इलेक्ट्रॉनमधून ऊर्जा मिळवत असत. विरघळलेला रेणवीय हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन दाता म्हणून काम करीत होता व त्यातून या सूक्ष्मजीवांना ऊर्जा मिळत होती. अमेरिकेच्या  ब्राऊन विद्यापीठातील जेसी टारनस यांनी म्हटले आहे की, मूलभूत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र यांचा विचार केला तर मंगळाच्या पृष्ठभागावर विरघळलेला हायड्रोजन खूप होता व त्यातून जीवावरणास ऊर्जा मिळत होती. अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स लेटर्स या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता. रेडिओलायसिस प्रक्रियेत प्रारणांमुळे पाण्याच्या रेणूंचे हायड्रोजन व ऑक्सिजनमध्ये विघटन होत असे. पृथ्वीवरही पूर्वी खालच्या भागात सूक्ष्मजीव होते तसाच प्रकार मंगळावरही होता.