न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी व्दिपक्षीय चर्चा करणार असल्याच्या वृत्ताला स्वत: पंतप्रधान सिंग यांनी दुजोरा दिला आहे.
अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेदरम्यान पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या शेजारील देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचे विधान त्यांनी केले.
डॉ. मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यामध्ये २९ सप्टेंबरला चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेदरम्यान पाकिस्तान प्रणित दहशतवादी हल्ल्यांवर भर राहणार असल्याची शक्यता आहे.
“भारताने सुरूवातीपासूनच पाकिस्तानच्या नियंत्रित भूभागावरून दहशतवादाला मिळत असल्याणाऱ्या प्रोत्साहनावर चिंता व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या ताब्यातील भूभागावरील सक्रिय गटांपासून भारताला सातत्याने दहशतवादाचा सामना करावा लागत आहे,” असे भारताच्या परराष्ट्र सचिव सुजाता सिंग मागील आठवड्यामध्ये म्हणाल्या होत्या.
भारतविरोधी प्रचार करणाऱ्या व्यक्ती पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरून भारताविरोधात विखारी प्रचार करत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.