दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज(दि.28) आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशीही दुसऱ्यांदा संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांचं आणि चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केलं. याशिवाय त्यांनी अन्य अनेक विषयांवरही भाष्य केलं.

‘चांद्रयान-२ पूर्णतः भारतीय रंगात न्हाऊन निघालेली मोहीम आहे. ते एक संपूर्णपणे स्वदेशी मिशन आहे. चांद्रयान २ मुळे भारतीय वैज्ञानिक श्रेष्ठ असल्याचं पुन्हा सिद्ध झालं आहे’, अशा शब्दात मोदींनी भारतीय शास्त्रज्ञांना कौतुकाची थाप दिली. जल संरक्षण , अमरनाथ यात्रा, विज्ञानाबाबत लहान मुलांची आवड वाढावी यासाठी प्रश्नोत्तर स्पर्धा अशा अनेक विषयांना यावेळी मोदींनी हात घातला. पाणी वाचविण्यासाठी वेगळी नीति तयार करणारं मेघालय देशातील पहिलं राज्य बनल्याचा मोदींनी आवर्जून उल्लेख केला आणि मेघालयच्या राज्य सरकारचं अभिनंदन केलं. यानंतर मोदींनी अमरनाथ यात्रे यशस्वी आय़ोजनासाठी काश्मीरच्या नागरीकांची प्रशंसा केली. गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यंदा अमरनाथ यात्रेत सर्वाधिक भाविक सहभागी झाल्याची माहितीही त्यांनी दिली. अमरनाथ यात्रेकरुंचं काश्मीरी लोकं मोठ्या आनंदाने स्वागत करतात आणि त्यांची मदत व सेवा ते करत असतात. जम्मू- काश्मीरमधील रहिवाशांना विकास हवा आहे आणि देशाचा विकास वाढवण्यासाठी लोकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. विकासाची शक्ती ही बॅाम्ब- बंदूकांच्या शक्तींपेक्षा जास्त मोठी आहे आणि जे द्वेष पसरवतात ते कधीही यशस्वी होत नाहीत, असंही मोदी म्हणाले.

देशातील विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या स्पर्धेद्वारे श्रीहरिकोटा येथे नेलं जाईल. प्रश्नोत्तर स्पर्धेत चांगले त्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा येथे 7 डिसेंबर रोजी चांद्रयान-२ ची लँडिंग पाहण्यासाठी नेलं जाईल असंही मोदींनी सांगितलं. याशिवाय क्रीडास्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिकणाऱ्या खेळाडूंचही मोदींनी कौतुक केलं आणि देशासाठी सन्मानाची व अभिनामानाची बाब असल्याचं ते म्हणाले.

दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत असतात. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर या कार्यक्रमाचे ५३ भाग प्रसारित झाले होते. मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील अखेरचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता.