उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एक स्टॉल चालवणारा मनोज कुमार सैनी हा साधासुधा व्यक्ती नसून गावातल्या लोकांसाठी तो खऱ्या अर्थाने सुपरमॅन आहे. गंगा किनाऱ्यावर ज्यूसची गाडी चालविणाऱ्या या २६ वर्षाच्या मुलाने ७ वेळा आपले प्राण धोक्यात घालून बुडणाऱ्यांना वाचविले आहे. आत्महत्या करायला आलेल्या ७ जणांचे प्राण वाचविल्याबद्दल पोलिस त्याला शौर्य पुरस्कार देण्याचा विचार करत आहेत. मनोज यांचा ज्यूस स्टॉल ज्याठिकाणी आहे ते ठिकाण सुसाईड पॉईंट म्हणूनही प्रसिद्ध आहे. शहरापासून १६ किलोमीटर आत असलेल्या या ठिकाणी लोक आपले आयुष्य संपविण्यासाठी येतात. तेव्हा मागील वर्षभरात याठिकाणी आत्महत्या करण्यासाठी येणाऱ्या ७ जणांचे प्राण या तरुणाने वाचवले आहे.

याबाबत मनोज म्हणाला, जेव्हा पहिल्यांदा मी एका व्यक्तीला गंगेत उडी मारताना पाहिले तेव्हा मला धक्का बसला. माझा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मग मी त्याचे प्राण वाचविण्यासाठी गंगेत उडी मारली. त्यानंतर मी जेव्हाही कोणाला गंगेत उडी मारताना पाहतो मी लगेचच उडी घेऊन त्या व्यक्तीचे प्राण वाचवतो. आता काही दिवस आधी मनोज यांनी ७० वर्षाच्या एका वृद्धाचा जीव वाचवला. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी मनोजविषयी बोलताना सांगितले, मनोजने पोहण्याचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. मात्र तरीही एखाद्या माश्याप्रमाणे तो अतिशय सुलभपणे पोहत जाऊन लोकांचे प्राण वाचवतो.

याबाबत मनोज म्हणाला, मी डोळ्यासमोर कोणाचे प्राण जाताना पाहू शकत नाही, म्हणून मी हे सगळे करतो. भोपा भागाचे पोलिस अधिकारी राजीव कुमार गौतम यांनीही मनोजच्या कामाबद्दल त्याचे कौतुक करत शौर्य पुरस्कारासाठी त्याचे नाव देण्याचा विचार सुरु असल्याचे सांगितले. त्यामुळे मृत्यूच्या दाढेतून लोकांना बाहेर काढणाऱ्या या तरुणाला सुपरमॅनच म्हणायला हवे.