राष्ट्रउभारणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, हे योगदान दुर्लक्षित करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, तरीही ज्या कुटुंबाने असे प्रयत्न केले त्यांच्यापेक्षा आंबेडकरांचाच लोकांवर जास्त प्रभाव राहिला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवर छुपा वार केला.


दिल्लीत गुरुवारी डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. या केंद्राशी जोडलेल्या प्रत्येक विभागाचे यावेळी मोदींनी अभिनंदन केले.


मोदी म्हणाले, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र हे देशातील तरुणांसाठी आशीर्वाद असून सामाजिक प्रश्नांवरील संशोधनासाठी हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल. आंबेडकरांचा सहवास लाभलेली सर्व ठिकाणे तीर्थस्थळे म्हणून विकास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


आमच्या सरकारमध्ये योजनांची अंमलबजावणीला उशीर करणे हा गुन्हा मानला जातो, असे सांगताना मोदी म्हणाले. डॉ. आंबेडकर केंद्राच्या निर्मितीचा निर्णय १९९२ मध्येच घेण्यात आला होता. मात्र, २३ वर्षांत येथे काहीच झाले नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.


मोदी म्हणाले, जे राजकीय पक्ष बाबासाहेबांचे नाव घेऊन मतं मागतात त्यांना आजकाल बाबासाहेब नव्हे तर बाबा भोले जास्त आठवतात असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी यावेळी राहुल गांधींना मारला. दरम्यान, मोदींनी यावेळी सरकारच्या विविध योजना या बाबासाहेबांच्या विचारांशी जोडलेल्या असल्याचे सांगितले.