अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचा ४६ वे अध्यक्ष म्हणून बुधवारी शपथविधी होत असून त्यांच्यापुढे अनेक कठीण आव्हाने असतील. त्यामुळे मार्गक्रमण कठीण आहे, असे नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरीस यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या की, बायडेन हे २० जानेवारीला व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करणार असून त्यांच्यापुढे देशाला करोनासाथीमुळे  झालेल्या आर्थिक व आरोग्य परिणामातून बाहेर काढण्याचे आव्हान आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३ लाख ९८ हजार लोक मरण पावले असून लाखो लोक आर्थिक दुष्टचक्रात सापडले आहेत. आम्हाला बरेच काम करून अनेक आव्हाने पेलायची आहेत याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही काम करायला तयार आहोत. आम्हाला जास्तीत जास्त काम  करावे लागेल व आमच्या काळातील मार्गक्रमण हे अवघड आहे, असे त्या म्हणाल्या.

जानेवारीतील तिसऱ्या सोमवारी दरवर्षी दिवंगत नागरी हक्क नेते मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांना श्रद्धांजली वाहिली जाते. त्यांनी १९५०-६० या काळात कृष्णवर्णीयांच्या समानतेसाठी व मतदान हक्कांसाठी लढा दिला होता. या निमित्ताने समाजसेवेचे कार्यक्रम दरवर्षी केले जातात. यावेळी करोना साथ व ट्रम्प समर्थकांची हिंसाचाराची भीती यामुळे या कार्यक्रमांवर परिणाम झाला.  हॅरीस यांनी सांगितले की, जो बायडेन यांनी आमचा लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे, ज्या लोकांना कामासाठी जावे लागते त्यांचा लसीकरणात समावेश केला आहे. अजूनही बरेच काही केले जाण्याची शक्यता आहे. आमची काही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे असून अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांचे सहकार्य मिळाल्यास ती पूर्णत्वास नेता येतील.

शपथविधीच्या सुरक्षेबाबत..

गुप्तचर अहवाल पाहता शपथविधीला जाताना सुरक्षित वाटते का, असे विचारले असता हॅरीस यांनी सांगितले की, अमेरिकेची मी नियोजित उपाध्यक्ष आहे. मी अभिमानाने शपथविधीला जाईन व ताठमानेने शपथ घेईन.

सामाजिक अन्याय

डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांनी आर्थिक व वांशिक न्यायासाठी लढा दिला होता त्यामुळे त्यांचे कार्य संस्मरणीय असेच आहे. त्यांची नागरी हक्क चळवळही देशाला एक मोठे वळण देणारी ठरली. आज आपण जेथे आहोत तेथे त्यांच्यासारख्या व्यक्तींमुळेच पोहोचलो आहोत हे विसरता कामा नये. त्यामुळे समाजातील अन्याय दूर करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

भूक आणि गरिबी

अमेरिकेत सध्या सहा कुटुंबात एकाला भुकेची समस्या आहे, पाच पैकी एकाला भाडे कसे भरावे याची चिंता आहे. तीनपैकी एकाला देयके कशी भरावीत याची चिंता आहे. पण आम्ही डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांचा वारसा पुढे नेऊन सामुदायिक जबाबदारीच्या तत्त्वाने वचनबद्ध आहोत त्यामुळे लोकांच्या अडचणी दूर करण्यास प्राधान्य देण्यात येईल.