काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह हे देशद्रोही असल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी दिग्विजय सिंह आणि काँग्रेसवरही टीका केली. ज्यांनी आपल्या आईला न्याय दिला नाही ते आता न्याय यात्रा काढत आहेत. ज्यांना काँग्रेसच्या कार्यकारिणीत स्थान मिळाले नाही त्यांनी समन्वय यात्रा काढली, असा टोलाही त्यांनी लगावला.

दिग्विजय सिंह असे व्यक्ती आहेत की, जर एखाद्या पोलिसाने दहशतवाद्याचा खात्मा केला. तर ते त्या दहशतवाद्याच्या घरी जातील. त्या दहशतवाद्याचा ‘जी’ म्हणून आदारार्थी उल्लेख करतील. त्यामुळे मला कधीकधी दिग्विजय सिंह यांचे हे पाऊल देशद्रोह्यासारखे वाटतात, असा आरोप त्यांनी केला.

दिग्विजय सिंह यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मध्य प्रदेश उद्धवस्त झाले होते. वीज नव्हती, पाणी नव्हते ना रस्ता होता. २००३ मध्ये भाजपाकडे एक बिमारू राज्य आले होते. भाजपाने याच राज्याला आता विकसित राज्यांच्या पंक्तीत नेऊन बसवले आहे. आता मला समृद्ध राज्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावा, असे त्यांनी म्हटले.