तीन मराठी विद्यार्थ्यांची नाममात्र दरात निवास व्यवस्था!
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या साहाय्यक कमांडंट पदाच्या मुलाखतीसाठी दिल्लीत आलेल्या थोडय़ाथोडक्या नव्हे तर तब्बल तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र सदनात निवासाची व्यवस्था केल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र परिचय केंद्राने दिले आहे. ‘महाराष्ट्र सदनाची मराठी विद्यार्थ्यांकडे पाठ’ असे वृत्त दै. ‘लोकसत्ता’त शुक्रवारी प्रसिद्ध झाले होते. त्याची गंभीर दखल राज्याच्या मुख्य सचिवांनी घेत महाराष्ट्र सदन व्यवस्थापनाची या प्रकरणी कानउघाडणी केली व स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. त्यानंतर महाराष्ट्र सदनाने परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या स्वाक्षरीने लेखी खुलासा केला आहे. त्यानुसार साहाय्यक कमांडंट पदासाठी महाराष्ट्रातून चाळीस विद्यार्थी पात्र ठरले असताना त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची नाममात्र दरात निवास व्यवस्था करण्याचे ‘औदार्य’ महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापनाने दाखवले आहे.
परिचय केंद्राच्या स्पष्टीकरणावर मुलाखतीसाठी दिल्लीत आलेल्या विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी नोंदवली. जर महाराष्ट्रातून सुमारे चाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर सदन तीन जणांचीच व्यवस्था कसे करू शकते, असा संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांमधून उमटला आहे. यंदा मुलाखतीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी सदनात गेले असता, त्यांना तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, असे सांगण्यात आले होते. तुम्ही ज्या मुलाखतीसाठी आले आहात, ते पद या सवलतीसाठी ग्राह्य़ धरले जात नसल्याचे सदनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील वर्षी याच पदासाठी दिल्लीत मुलाखतीसाठी आलेल्या पंधरा जणांची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली होती. त्यांच्यातून साहाय्यक कमांडंट असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही सोय केवळ यूपीएससी परीक्षेच्या मुख्य परीक्षेच्या मुलाखतीत उत्तीर्ण झाल्याचा नियम सांगण्यात आला. सदनातील कर्मचाऱ्यांच्या लेखी यूपीएससी म्हणजे केवळ आयएएस व आयपीएस. त्यांना साहाय्यक कमांडंट पासाठी यूपीएससीच परीक्षा घेते हे आम्ही सांगितले. पण ते आम्हालाच नियम दाखवा म्हणत होते. तेव्हा प्रमोद कोलप्ते नावाच्या तत्कालीन व्यवस्थापकांनी आम्हाला मदत केली व त्यांच्याच कर्मचाऱ्यांना नियम समजावून सांगितला. त्यानंतर आम्हाला प्रवेश मिळाला होता.