अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे हल्लेखोरांकडून संरक्षण करण्यासाठी डीआरडीओने अत्याधुनिक उपकरण विकसित केले आहे. या लेजर उपकरणाच्या मदतीने लपून बसलेल्या हल्लेखोरासह त्याच्या अत्याधुनिक बंदुकीचा ठाव घेऊन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे रक्षण करणे शक्य होणार असल्याचे डीआरडीओने म्हटले आहे.
कुठेही वाहून नेण्यायोग्य असलेल्या या अत्याधुनिक उपकरणाच्या मदतीने कुठेही लपून बसलेल्या सशस्र हल्लेखोराचा माग काढणे शक्य होणार आहे. या उपकरणातील यंत्रणा त्या दृष्टीने विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संभाव्य हल्ल्याआधीच अत्याधुनिक शस्रास्रांसह लपून बसलेल्या हल्लेखोराला पकडता येईल, असा विश्वास डीआरडीओच्या लेजर विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राचे संचालक अनिल कुमार माइनी यांनी व्यक्त केला.

या उपकरणाची चाचणी घेतली तेव्हा ३०० मीटपर्यंतचे लक्ष यशस्वीपणे केले.
 उपकरणातून निघणाऱ्या लेजर किरणांमुळे परिसराची छाननी होते आणि त्यावेळी बंदुकीची दुर्बीण वा तत्सम वस्तू तात्काळ दिसेल. मात्र याची कल्पना हल्लेखोराला मिळू शकणार नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
आतापर्यंत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी परदेशातून आणलेली उपकरणे वापरती जातात. मात्र ही उपकरणे अत्यंत महाग आहेत. त्यामुळे आता स्वदेशी बनावटीची ही सुरक्षा उपकरणे परदेशी उपकरणांच्या तुलनेत स्वस्त असल्याचेही माइनी यांनी सांगितले.
दरम्यान, स्वदेशी बनावटीच्या या सुरक्षा उपकरणामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठा हातभार लागेल, असा विश्वास राष्ट्रीय सुरक्षा दलाचे प्रमुख जे एन चौधरी यांनी व्यक्त केला.