हिंसाचाराचे केंद्र ठरलेल्या मथुरेतील जवाहरबाग येथील अतिक्रामकांनी न्यायालये व तुरुंगाच्या कोठडय़ा स्थापन करून त्यांची स्वत:ची प्रशासन व्यवस्था प्रस्थापित केली होती आणि देशाची घटना व कायदे नाकारणारे हे लोक आपल्या ‘नियमांचे’ उल्लंघन करणाऱ्या सहकाऱ्यांना शिक्षा देऊन त्यांचा छळ करत होते, असे उघडकीला आले आहे.
या लोकांनी स्वत:ची वसाहत स्थापन केली होती आणि तेथे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांनी तेथे सरकारही चालवले होते. त्यांनी लोकांना शिक्षा देणे व त्यांचा छळ करणे सुरू केले होते. त्यांनी न्यायालये व तुरुंगाच्या कोठडय़ा उभारल्या होत्या, तसेच प्रवचन केंद्रे व तख्तही सुरू केले होते, असे आग्रा परिक्षेत्राचे महानिरीक्षक दुर्गाचरण मिश्रा यांनी सांगितले.
मात्र या लोकांनी सशस्त्र गुंडांचे तीन-चार गट स्थापन केले होते व त्यांना ‘बटालिअन’ असे नाव दिले होते, परंतु त्याला सैन्य म्हणता येणार नाही, असे आग्य्राचे विभागीय आयुक्त प्रदीप भटनागर म्हणाले.
एखादा नागरिक किंवा अधिकारी आत गेला की हे लोक त्याच्यावर हल्ला करत. त्याचप्रमाणे हे लोक कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या अनुयायांना बाहेर पडण्याची मुभा देत नसत.