स्वाधीन भारत विधिक सत्याग्रही व स्वाधीन भारत सुभाष सेना ही दोन नावे मथुरेतील गुरुवारच्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सामोरी आली आहेत. या संघटनांनी जवाहर बाग भागात शेकडो एकर जमिनीवर मार्च २०१४ पासून अतिक्रमण केले, त्यामुळे प्रशासनाशी संघर्ष सुरू होता. ते अतिक्रमण उठवण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला असता पोलिस तेथे गेले, त्या वेळी तुंबळ धुमश्चक्रीत दोन पोलिस अधिकाऱ्यांसह २४ जण ठार झाले. या दोन्हीं संघटनाबाबत उपलब्ध असलेली माहिती.
स्वाधीन भारत सुभाष सेना किंवा भारतीय सुभाष सेना ही संस्था २०१३ पासून राजकीय पक्ष म्हणून नोंदली गेली आहे. या गटाचे सदस्य असा दावा करतात, की ते नेताजी सुभाषचंद्रांचे खरे अनुयायी स्वत:ला समजतात, नेताजींच्या नष्ट होण्यात कटाचा भाग होता असा त्यांचा आरोप आहे. डिसेंबर २०१४ मध्ये पक्षाची पदाधिकारी असलेल्या एका महिलेने मद्रास उच्च न्यायालयात नेताजींबाबतची कागदपत्रे खुली करण्याची मागणी याचिकेत केली होती. तिने असा दावा केला होतास की नेताजी अजून जिवंत आहेत व नेताजींना युद्धगुन्हेगार ठरवले जाणार नसेल, तर नेताजींना न्यायालयापुढे हजर करण्यात येईल, स्वाधीन भारत विधिक हा दुसरा एक गट असून ते फेसबुक पेजवर राष्ट्रीय आंदोलन चालवतात. त्यांच्या पोस्ट बघितल्या तर ते जय गुरुदेव यांचे अनुयायी आहेत व त्यांच्या मागण्या भारतीय सुभाष सेनेसारख्याच आहेत. या आंदोलनात स्वाधीन भारत हा एक गट असला, तरी आझाद भारत विविध वैचारिक क्रांती जनजागरण ही एक तशीच चळवळ आहे, असे असले तरी या दोन चळवळी तेच लोक चालवत आहेत की नाही हे समजलेले नाही. फेसबुक पेजनुसार स्वाधीन भारतचे केंद्रीय नेतृत्व नाही, अनेक लोक ही चळवळ चालवत आहेत.

त्यांचे दावे काय आहेत.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे अचानक बेपत्ता झाले व त्यामागे कट आहे. २००६ मध्ये सुभाष सेनेच्या सदस्याने नेताजी अजून जिवंत असून १०९ वर्षांचे असल्याचे म्हटले होते. उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्य़ात मुजाहना जंगलात नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्याला भेटले होते असा दावा त्याने केला होता. भारतीय चलन हे जगात मजबूत असायला हवे. १ रुपया चलन ९७२ मिलीग्रॅम सोन्याच्या किमतीचे आहे. त्यामुळे जवाहरबाग येथे एका नेत्याने २०१४ मध्ये असे सांगितले होते, की एक रुपयात ६० लिटर डिझेल मिळायला हवे. सध्या जे चलन आहे ते ब्रिटिश काळातील असून ते बदलून आझाद हिंद बँक चलनी नोटांनी बदलायला हवे. या गटाचे सदस्य अनेकदा असा दावा करतात, की बाबा जय गुरुदेव किंवा तुलसीदास हे खरे नेताजी आहेत. २०१२ मध्ये जय गुरुदेव यांचा मृत्यू झाला व त्यामुळे आश्रमाचे विश्वस्त व समर्थक यांच्यात दावे-प्रतिदावे झाले व समर्थकांनी विश्वस्तांवर गुरुदेवांच्या अपहरणाचा आरोप केला. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत असल्याच्या नावाखाली पैसे गोळा करणे सुरू केले. त्यांनी गुरुदेवांचे मृत्यू प्रमाणपत्र मागितले पण फेसबुक पोस्ट बघितल्या तर त्यांनी तुलसीदास नावाने असलेला मृत्यूदाखला नाकारला. मेदांत हॉस्पिटलने बाब जय गुरुदेव यांना दाखल करून उपचार केल्याचा इन्कार केला पण मथुरा आश्रमच्या विश्वस्तांच्या मते बाबा जय गुरुदेव हे १८ मे २०१२ रोजी मरण पावले व १९ मे २०१२ रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते श्रद्धांजलीसाठी उपस्थित होते.

चळवळीच्या मागण्या
स्वाधीन भारत चळवळीने आझाद हिंद सरकारच्या स्थापनेची मागणी केली असून राष्ट्रपती व पंतप्रधानांची निवडणूकच रद्द करावी, तसेच चलनाचे अवमूल्यन रद्द करावे असे त्यांचे म्हणणे आहे. आताच्या चलनाऐवजी आझाद हिंद चलन वापरण्याची त्यांची मागणी आहे. देशवासीयांनो तुमच्या खिशात जे चलन आहे, ते भारतीय नाही कारण रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना राणी व्हिक्टोरियाने १९३४ मध्ये केली होती. आपली भारतीय बँक हे आझाद हिंद बँक असून ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ५ एप्रिल १९४४ रोजी बर्मी कायद्यान्वये रंगून येथे स्थापन केली व त्याला ९ देशांची मंजुरी होती असे या संघटनांचे म्हणणे आहे.