आगामी लोकसभा निवडणुका वर्षभरावर आल्या असतानाच केंद्रातील आघाडीच्या सत्तागणितांमध्ये प्रभावी असलेल्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी आपली ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस असो की भाजप या दोघांनाही पाठिंब्यासाठी झुलवत ठेवणाऱ्या बसपच्या प्रमुख मायावती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या जयललिता यांना आत्तापासूनच पंतप्रधानपदाचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे, बुधवारी या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यासाठी साद घालत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पद मिळवण्यासाठीची मायावती यांची इच्छा आजवर लपून राहिलेली नाही. याच पाश्र्वभूमीवर बुधवारी, आपल्या वाढदिवशी त्यांनी बसपच्या कार्यकर्त्यांकडून ‘पंतप्रधानपदाची’च भेट मागितली. आपल्या ५७व्या वाढदिवसानिमित्त लखनऊत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांनी आपापले भेदाभेद विसरून मला पंतप्रधान बनण्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. केंद्रातील काँग्रेसप्रणीत यूपीए आणि भाजपप्रणीत एनडीए हे दोन्ही पक्ष जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले असून जनतेला नवा पर्याय हवा आहे, असे त्या म्हणाल्या. हा पर्याय आपला पक्ष देऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीही तामिळनाडूतील सर्वच्या सर्व लोकसभा जागा निवडून आणा, अशी साद पक्ष कार्यकर्त्यांना घातली. राज्याच्या वाजवी मागण्या धसास लावण्यासाठी लोकसभेच्या पुढील निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या तयारीला लागा, असे आवाहन जयललिता यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
तामिळनाडूच्या रास्त मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आणि केंद्रात सरकार स्थापनेत अ.भा.अद्रमुकला निर्णायक भूमिका बजाविता येणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील ३९ आणि पुडुचेरीतील एक अशा ४० जागाजिंकण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन जयललिता यांनी केले आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी असेच आवाहन पक्षकार्यकर्त्यांना करताना जयललिता यांनी ‘मला केंद्रातील प्रमुख पदावर जाण्यास ताकद द्या’ असे भावपूर्ण आवाहन अण्णाद्रमुक कार्यकर्त्यांना केले होते.