भारताच्या श्रीमंत उद्योजकांमध्ये त्यांचा समावेश नाही, त्यांना कधीही प्रसिद्ध मिळाली नाही, पण त्यांच्या संपत्तीची आकडेवारी कोणालाही थक्क करणारी आहे. ही व्यक्ती आहे मायावती यांचे बंधू आनंद कुमार. विशेष म्हणजे अवघ्या सात वर्षात आनंद कुमार यांची संपत्ती सात कोटींवरुन थेट १,३०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने आनंद कुमार यांची आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याचे वृत्त दिले आहे. आयकर विभागाच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. २००७ – २०१४ या कालावधीत आनंद कुमार यांची एकूण संपत्ती सात कोटींवरुन थेट १३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आनंदकुमार हे आकृती हॉटेल्स या कंपनीमध्ये भागधारक आहे. आकृती हॉटेल ही दिल्लीतील कंपनी असून या कंपनीमध्ये तीन संचालक आणि ३७ भागधारक आहेत. या कंपनीमध्ये भास्कर फंड मॅनेजमेंट, क्लिफट पिअर्सन एक्स्पोर्ट आणि डेल्टन एक्झिम या तीन कंपन्यांचे ५ लाख शेअर्स आहेत. मात्र या तिन्ही कंपन्या एकाच इमारतीतून चालवल्या जात असल्याचे समोर आले असून कंपनीचे संचालक मंडळही तेच आहे. आकृती हॉटेल्समधील अन्य भागधारकांच्या कार्यालयामध्येही हाच प्रकार समोर येत आहे. त्यामुळे या कंपन्या फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याचे स्पष्ट होते. आयकर विभागाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची आता चौकशीही सुरु झाली आहे.

आनंद कुमार यांच्या संपत्तीमध्ये ज्या कालावधीत वाढ झाली त्या कालावधीत मायावती या उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. त्यामुळे आनंद कुमार यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे. आनंद कुमार हे काही दिवसांपूर्वी बँक खात्यात कोट्यावधी रुपये आढळल्याने चर्चेत आले होते. नोटाबंदीनंतर सक्तवसुली संचालनालयाने देशभरातील बँकांमध्ये तपासणी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी ईडीचे पथक दिल्लीतील करोलबागमध्ये युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले होते. याच शाखेत आनंद कुमार यांचेही बँक खाते आहे. या बँक खात्यामधील व्यवहारावर ईडीला संशय आला होता. या बँक खात्यात एकूण १ कोटी ४३ लाख रुपये सापडले आहे. यातील १८ लाख ९८ हजार रुपयांच्या जुन्या नोटा या नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा झाल्याचे समोर आले होते. तेव्हा पासून आनंद कुमार हे आयकर विभागाच्या रडारवर आहेत. तर सूडाच्या राजकारणातून ही कारवाई केली गेली असा दावा बसपने केला होता.