कथुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालविण्याची विनंती करणारे पत्र जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना लिहिले आहे. याद्वारे ९० दिवसांत खटल्याचा निकाल लागणार असून राज्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच न्यायालय असेल, असे सूत्रांनी सांगितले. तसेच यातील आरोपी असलेल्या पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे.

मलिवाल यांचे उपोषण

नवी दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल या उन्नाव आणि कथुआ बलात्काराच्या घटनांच्या निषेधार्थ आमरण उपोषणाला बसल्या आहेत. शनिवारी दुसऱ्या दिवशी त्यांनी महिलांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

‘गुन्हेगारांना कठोर शासन होईल’

संयुक्त राष्ट्रसंघ : कथुआ जिल्ह्य़ात आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार भीषण असल्याचे मत संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अ‍ॅण्टोनिओ ग्युटर्स यांनी व्यक्त केले आहे. गुन्हेगारांना प्रशासन कठोर शासन करील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘आरोपींना फासावर लटकलेले पाहायचेय’

उधमपूर : माझी आठ वर्षांची मुलगी खूप सुंदर आणि हुशार होती. तिला डॉक्टर बनवायचे माझे स्वप्न होते. मात्र, या घटनेने स्वप्न हिरावले गेले. या नराधमांना फासावर लटकावलेले आपल्याला पाहायचे आहे, अशी इच्छा कथुआ बलात्कार प्रकरणातील मुलीच्या आईने व्यक्त केली आहे. भविष्यात कोणावरही अशी वेळ येऊ नये. या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणार नाही कारण गुन्हे शाखेवर विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.