02 March 2021

News Flash

जॉर्ज फर्नांडिस.. असामान्य नेत्याच्या सामान्य गोष्टी

संरक्षणमंत्री असतानाही ते स्वत:चे कपडे स्वत: धूत.

मुंबईतल्या कामगार चळवळीचे प्रणेते आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. फर्नांडिस यांच्या निधनावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

वर्षभरापूर्वी अभिनेत्री मनवा नाईक हीने सेलिब्रिटी लेखक म्हणून लोकप्रभासाठी विशेष लेख लिहीला होता. या लेखामध्ये तिने समान्यांसमोर न आलेल्या जार्ज फर्नांडिस यांच्याबद्दलच्या खास आठवणी ‘आमचे जॉर्जकाका’ या लेखातून शेअर केल्या होत्या. तो लेख पुनर्प्रकाशित करीत आहोत.

”जॉर्ज फर्नाडिस यांच्याविषयी पूर्ण माहिती असण्याआधीच मी त्यांना भेटले. सकाळी फोन यायचा लॅण्डलाइनवर आणि हातातली सगळी कामं बाजूला सारून मम्मा-दादा (आई-वडील) तयारीला लागायचे. कोण हा माणूस, इतका का महत्त्वाचा.. तेव्हा कळायचं नाही, पण कालांतराने मला कळलं जॉर्ज फर्नाडिस ही एक पुण्याई आहे.

जॉर्जकाका मुंबईत आले कीते आमच्या घरी येत. त्यांच्याबरोबर त्यांची सहकारी समाजवादी मंडळी आमच्याकडे जमा व्हायची. साधे कॉटनचे कपडे, सदरा लेंगा किंवा कॉटन साडी; भडक रंग नाहीत. सामान्य लोकांचा विचार करणारे असे हे लोक येत. आणि मग जॉर्जकाकांचं आगमन. हातात एक बॅग.. त्यात पेपर्स आणि अनेक पुस्तकं.. मग दिवसभर आमच्याच घरात मीटिंग्ज. अनेक लोक भेटायला येत. भरपूर गलका असे. रात्रीच्या विमानाने जॉर्जकाका काम संपवून दिल्लीला परत जात.

या आख्ख्या ट्रिपमध्ये त्यांना एक गोष्ट हवी असायची. ती त्यांनी कधीही मागितली नाही, पण मम्मा बनवायची. ते म्हणजे सारस्वत पद्धतीचे मासे (फिश करी). दिवसभराच्या कामात ते फक्त मासे खायला ब्रेक घेत.

जॉर्जकाका यायचे तेव्हा विमानात मिळालेल्या गोळ्या, चॉकलेट ते खिशातून आणत. घरात आले की ते सगळी चॉकलेट्स आमच्या कुत्र्याला द्यायचे. मला वाटायचं मला का नाही देत? पण कोण जाणे त्यांनी ती कधीच मला दिली नाहीत. ते कुत्र्यालाच देत. कारण त्यांचं कुत्र्यांवर खूप प्रेम. मला नाही दिलं, पण कुत्र्याला दिलं, म्हणून मलाही कधी वाईट वाटलं नाही.

दिल्लीला त्यांच्याकडे डॉगीबॉय नावाचा कुत्रा होता. ते नेहमी त्याचं कौतुक सांगत. ‘तो माझं भाषण ऐकतो’ असं म्हणत. जॉर्जकाकांच्या एका आदेशावर आख्खी मुंबई स्तब्ध होत असे. पण जॉर्जकाकांना डॉगीबॉयच्या ऐकण्याचं कौतुक होतं. तो त्यांचा घरचा कार्यकर्ता होता ना!

१९९३ मध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले आणि जॉर्जकाका मुंबईत आले. या वेळेस मीटिंग्ज नव्हत्या, तर दंगलीमुळे त्रासलेल्या, िहदू-मुस्लीम तणावात अडकलेल्या लोकांना ते भेटायला आले होते. अतिशय भीतिदायक परिस्थिती होती तेव्हा मुंबईमध्ये. कर्फ्यू होता. दंगल सुरू होती. तेव्हा जॉर्जकाका, दादाला (बाबा) घेऊन मुंबईतल्या भेंडीबाजारला भेट द्यायला गेले. पोलीस संरक्षण नाही, कार्यकत्रे नाहीत, तेच एकटे.

जॉर्जकाका दिल्लीला परतले, आणि मम्मा दादाने बेहरामपाडय़ात जायला सुरुवात केली. तेव्हा बेहरामपाडा पेटला होता. त्यांना मदतीची गरज होती. मम्मा, दादा आणि बांद्रा पूर्वेकडील इतर सहकारी रोज जात शांतता प्रस्थापित करायला. तेथील लोकांबरोबर मत्री करायला. त्यांच्या मुलांना शाळेत सोडायला. हळूहळू तणाव कमी झाला. फार साहस देणारं होतं हे सगळंच.

२००१ मध्ये जॉर्जकाका संरक्षण मंत्री झाले. त्यांच्याच काळात पोखरण येथे अण्वस्त्र चाचणी झाली. भारताला पुन्हा एकदा जागतिक नकाशावर महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं. ते सियाचेनला गेलेले पहिले संरक्षण मंत्री.

ते संरक्षण मंत्री असताना मला योग आला त्यांच्या ३, कृष्ण मेनन मार्ग या घरामध्ये राहायचा. हा देशाच्या संरक्षण मंत्र्याचा बंगला. पण त्या बंगल्याला गेट नव्हतं. नव्हतं म्हणजे होतं ते जॉर्जकाकांनी काढून टाकलं होतं. त्यांचं घर आणि हृदय खुलं होतं सगळ्यांसाठीच.

त्या बंगल्यात जॉर्जकाका, त्यांचे सहकारी अनिल, एक कुक दुर्गा इतकेच लोक राहायचे. अनेक नोकर, ड्रायव्हर, सिक्युरिटी, पोलीस असं कुणी कुणी नाही. काही बर्मीज निर्वासित काही दिवस आश्रयाला होते. सकाळी मोठय़ा बोलमध्ये पॉरिज आणि रात्री चिकन किंवा भाजी हे जॉर्जकाकांचं जेवण. जेवणाच्या वेळी खूप गप्पा, बाकी पूर्ण दिवस ते त्यांच्या अभ्यासिकेत काम करत. तिथे एक इंच जागा नव्हती. कारण सगळी खोली पुस्तकांनी भरलेली असायची. संरक्षणमंत्री असतानाही ते स्वत:चे कपडे स्वत: धूत.

संरक्षणमंत्री असतानाही सुरक्षा न घेता फिरणं जॉर्जकाकांना आवडायचं. त्यांचे विचार होते स्वातंत्र्याचे. एकदा आम्ही घरी असताना जॉर्जकाकांच्या पी.ए.चा फोन आला की संध्याकाळी चार वाजता जॉर्जसाहेब मुंबईमध्ये इंडियन एअर लाइन्सच्या विमानाने उतरतील. कोणालाही माहीत नाहीये. तुम्ही न्यायला या. दादा, शारिवा आणि मी आमची मारुती ८०० घेऊन विमानतळावर पोहोचलो. तिथले सुरक्षा अधिकारी म्हणाले ‘इथे गाडी पार्क करता येणार नाही’. दादाने सांगितलं ‘डिफेन्स मिनिस्टर आ रहे हैं’ त्याने आम्हाला मूर्खात काढलं. ‘हमें इन्फॉर्मशन नही हैं, ना डिफेन्स से, ना एअरपोर्ट सेक्युरिटी से, ना मुंबई पोलीस से. डिफेन्स मिनिस्टर है तो एअरफोर्स, नेव्ही, और आर्मी को भी इन्फॉर्मशन होता है’आणि दादा हसला आणि म्हणाला ‘वो देखो’, मागून नेहमीप्रमाणे हातात बॅग आणि काही कागद घेऊन जॉर्जकाकांचं आगमन झालं होतं. त्यांच्यामागे त्यांचा पी. ए. सुब्रमण्यम. एअरपोर्ट हैराण. ‘डिफेन्स मिनिस्टर विथ नो सेक्युरिटी, नो रेड लाइट, नो पोलीस, निथग’. दादाने बॅग घेतली आणि आम्ही मारुती ८०० मध्ये बसलो. एअरपोर्ट ते आमचं घर या प्रवासात जॉर्ज काकांनी खूप गप्पा मारल्या. आजूबाजूच्या गाडीतले लोक पाहू लागले. जॉर्ज काका मात्र गप्पांमध्ये रमले होते. घरी आलो आणि नेहमीप्रमाणे ते कामात गुंतले.

जॉर्जकाका घरी आले म्हणजे फिश करी हवीच. मम्मा घरी नव्हती, त्यामुळे शारिवाने हॉटेलमधून मागवली. कॉम्रेड डांगेची मुलगी रोझा भेटायला आल्या होत्या. त्याही जेवायला बसल्या. भात कमी पडला, माझी आणि शारिवाची तारांबळ उडाली. आम्हाला भात लावता येत नव्हता. मम्मा काय करते, ते आठवून आठवून आम्ही प्रयत्न केला आणि ‘गुरगुटय़ा’ म्हणतात तसा भात जॉर्जकाका आणि रोझा डांगेंना वाढला. ‘गर्ल्स हॅव कुक्ड’ असं म्हणून त्यांनी तो फार कौतुकाने खाल्ला. आम्हालाही बरं वाटलं. आम्ही या निमित्ताने भात लावायला शिकलो.

घरी आले की कितीही बिझी असले तरी जॉर्ज काका माझ्याशी आणि शारिवाशी प्रेमाने गप्पा मारत. कधी खूप मूडमध्ये असले की जॉर्जकाका त्यांचे किस्से दादाला सांगत. आणीबाणीच्या काळातले, अटक झाली तेव्हाचे, जेलमधल्या आयुष्याचे असे अनेक किस्से ते सांगत. त्यांना घरून धर्मगुरू (प्रीस्ट) व्हायला पाठवलं होतं. तिथून ते पळाले आणि मुंबईला आले. आणिबाणीच्या काळात ते भूमिगत होते. तेव्हा एका पोलीस ऑफिसरने त्यांनाच विचारले की, ‘जॉर्ज फर्नाडिस को देखा है?’ ते नाही म्हणाले. कारण वेशांतर केलेले ते जॉर्ज फर्नाडिस होते. ते मुंबईत आले तेव्हा फुटपाथवर झोपले. पहिल्या रात्री त्यांना कोणी तरी अडवलं आणि ‘ये मेरी जगह है’ असं सांगितलं. मुंबईमध्ये फूटपाथसुद्धा रिझव्‍‌र्ह केला जातो हे त्यांना कळलं.

जॉर्जकाकांचे किस्से मला प्रेरणादायी आणि सिनेमॅटिक वाटतात. धर्मगुरू व्हायला पाठवलेला हा मुलगा. त्याने मुंबईत युनियन, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक स्थापन केली. बिहार निवडणुका, रेल्वे मिनिस्टर, जनता दल, समता पार्टी, खासदार, मुजफ्फरपूर, संरक्षणमंत्री, अण्वस्त्र चाचणी, एन.डी.ए. हे सर्व जगलेला हा माणूस.

एक अतिशय चार्मिग आणि कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्त्व म्हणजे जॉर्जकाका. वडिलोपार्जति सोडली तर त्यांच्याकडे इतर काहीही मालमत्ता नाही. त्यांनी पसे कमवले नाहीत पण त्यांनी माणसं घडवली, विचार घडवले. या निर्व्यसनी माणसाला फक्त कामाचं व्यसन होतं. प्राणी, माणूस आणि प्रगतीवर प्रेम करणारा असा पुढारी होणे नाही!”

(सौजन्य – लोकप्रभा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 11:33 am

Web Title: memories of george fernandes by marathi actress manwa naik
Next Stories
1 शीख, साधूबाबा आणि बडोदा डायनामाइट खटला; आणबाणीच्या काळातील जॉर्ज फर्नांडिस यांचा लढा
2 फर्नांडिस म्हणाले स्फोट झाला आणि मुलायमसिंह पहातच राहिले!
3 Ram Janambhumi Babri Masjid land Case : वादग्रस्त जागा वगळता उर्वरित जागेवरील स्थगिती हटवावी: केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका
Just Now!
X