भारतीय जनता पार्टीचे उत्तराखंडमधील नेते संजय कुमार यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. ‘महिलेने आरोप केल्यानंतर संजय कुमार यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली होती. यानंतर पक्षाने त्यांना पदावरुन मुक्त केले’, अशी सारवासारव भाजपाचे उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी केली.

देशभरात मी टू मोहिमेत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील भाजपाचे नेते संजय कुमार यांच्यावरही एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ‘अमर उजाला’ या हिंदी दैनिकाला महिलेने प्रतिक्रिया दिली होती. यात संजय कुमार हे गेल्या पाच वर्षांपासून माझं शोषण करत असून पक्षातील अनेक नेत्यांकडे मी त्यांच्याविरोधात तक्रार केली. पण त्यांच्यावर कारवाई झालीच नाही, असे त्या महिलेने म्हटले होते. पीडित महिला ही भाजपामध्येच सक्रीय आहे.

महिलेच्या आरोपानंतर संजय कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. संजय कुमार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली असून यासाठी काँग्रेसतर्फे विविध भागांमध्ये आंदोलनही करण्यात आले.  तर भाजपाने याबाबत मौन बाळगले होते.

अखेर गुरुवारी भाजपाने या प्रकरणावर मौन सोडले आहे. संजय कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. मात्र, भाजपाचे उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी संजय कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले नाही. त्यांनी स्वत:हूनच पक्षनेतृत्वाला पत्र पाठवून या पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली होती. यानुसार त्यांना पदावरुन मुक्त करण्यात आले आहे, असा दावा केला.
संजय कुमार हे संघाची माजी प्रचारक असून गेल्या सात वर्षांपासून ते भाजपाचे उत्तराखंडमधील महासचिव होते.