केंद्रीय विदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. अकबर यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांनी या आरोपांवर समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

पत्रकार आणि  केंद्रीय विदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अकबर हे पत्रकारिता क्षेत्रात असताना त्यांनी लैंगिक छळ आणि असभ्य वर्तन केल्याचा आरोप सात महिलांनी केला आहे. या महिला अकबर यांच्यासोबत काम करायच्या. अकबर वृत्तपत्राचे संपादक असताना त्यांनी आपल्याला त्रास दिला होता असे या महिलांनी म्हटले आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक झाली आहे.

केंद्रीय विदेश राज्यमंत्री अकबर यांनी या प्रकरणावर समाधानकारक उत्तर द्यावे किंवा पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते जयपाल रेड्डी यांनी केली आहे. अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी देखील अकबर पत्रकारितेत असतानाचे हे आरोप आहेत. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या सरकारची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी केली.

दरम्यान, एम. जे. अकबर ‘टेलिग्राफ’चे संपादक असताना नोकरी देण्यासाठी घेतलेल्या मुलाखतीवळी अकबर यांनी कसा लैंगिक छळ केला याची माहिती प्रिया रमाणी यांनी दिल्यानंतर अकबर यांच्याविरोधात वादळ उठले. या सर्व प्रकरणात पंतप्रधान मोदी यांनी मौन बाळगले आहे.