राष्ट्रपतीपदाची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशा राजकीय घडामोडी रंगतदार होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असेल, यावरून अनेक अंदाज बांधले जात आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीसह संपूर्ण राजकीय वर्तुळाला भाजपच्या निर्णयाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अजूनही कोणालाही याचा थांगपत्ता लागून दिलेला नाही. सुरूवातीला एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, बाबरी मशिद खटल्यात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अडवाणींचे नाव मागे पडले होते. त्यानंतर काल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूत्रांकडून वर्तवण्यात आली होती. मात्र, आता या स्पर्धेने आणखी एक रंगतदार वळण घेतले असून कोणालाही अपेक्षा नसलेले ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांचे नाव अचानकपणे चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे शनिवारी कोची मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ई.श्रीधरन व्यासपीठावर एकत्र येत असल्याने या चर्चेला अधिकच उधाण आले आहे. मात्र, भाजपचा गेल्या तीन वर्षांतील एकूणच प्रवास पाहता ‘एनडीए’कडून राष्ट्रपतीपदासाठी अराजकीय व्यक्तीची निवड केली जाण्याची शक्यता फारच धुसर असल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या ‘या’ महिला नेत्या असू शकतात ‘एनडीए’च्या उमेदवार!

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्यासाठी ‘एनडीए’कडून नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे सदस्य व्यंकय्या नायडू यांनी नुकतीच शरद पवार यांच्याशी चर्चा केली असून ते लवकरच त्यांना भेटण्याची शक्यता आहे. याशिवाय, आज दिल्लीत नायडू आणि राजनाथ सिंह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. आम्ही विरोधकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून राष्ट्रपतीपदाबाबतच्या चर्चेत त्याचा विचार करता येईल, अशी प्रतिक्रिया नायडू यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, कालच कोची मेट्रोच्या उद्घाटनाला ई. श्रीधरन यांना निमंत्रित न करण्यात आल्यामुळे मोठा वाद रंगला होता. पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर आधी श्रीधरन यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. केरळ सरकारने श्रीधरन यांच्या नावाचा समावेश निमंत्रण पत्रिकेत करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र पंतप्रधान कार्यालयाला लिहिले होते. यासोबतच केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांच्या नावाचा समावेशदेखील निमंत्रण पत्रिकेत करण्यात यावा, अशी मागणी केरळ सरकारने केली होती. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने केवळ चेन्नीथला यांच्या नावाचाच निमंत्रण पत्रिकेत समावेश केला. या निर्णयावर अनेकांनी टीका करण्यास सुरूवात केली. अखेर काल संध्याकाळी ई. श्रीधरन यांना उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

१५० निवडणुकांमध्ये पराभूत होऊनही ‘ते’ लढवणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक