‘मोटर व्हेइकल अॅक्ट 2019’ अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या रकमेच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु लोकांची नाराजी पाहता काही राज्य यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपामई यांनी दंडाच्या रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी संताप व्यक्त करत ‘मोटर व्हेइकल अॅक्ट 2019’ मध्ये कोणालाही बदल करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

“मी सर्व राज्य सरकारांकडून माहिती घेतली आहे. हा कायदा लागू करणार नाही असं आतापर्यंत कोणत्याही राज्याने सांगितलेलं नाही आणि कोणत्याही राज्याला यातून बाहेर पडण्याची सुटही नाही,” असं गडकरी यांनी सांगितलं. “वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर आकारण्यात येणारा दंड हा कोणाचेही खिसे भरण्यासाठी नाही. वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले आहेत. यापूर्वी अतिवेगात गाडी चालवल्यामुळे आपल्याकडूनही दंड आकारण्यात आला होता,” असंही ते म्हणाले.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी नुकतीच नव्या दंडाच्या रकमेबाबत घोषणा केली. पोलिसांनी विना हेलमेट पकडल्यास नव्या नियमांनुसार आकारल्या जाणाऱ्या 1 हजार रूपयांऐवजी गुजरातमध्ये 500 रूपये आकारण्यात येणार आहे. तर सीट बेल्ट न लावता गाडी चालवल्यास 1 हजार रूपयांऐवजी 500 रूपये दंड भरावा लागणार आहे. याव्यतिरिक्त धोकादायकरित्या वाहन चालवल्यास नव्या नियमांनुसार 5 हजार रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. पंरतु यासाठी गुजरातमध्ये तीन तारी वाहनांकडून 1 हजार 500, हलक्या वाहनांसाठी 3 हजार रूपये आणि अन्य वाहनांसाठी 5 हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे.