लॉकडाउनमुळं देशातील विविध भागात अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, या गाड्या केवळ संबंधित राज्य सरकारांच्या विनंतीनुसारच सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेहमीच्या इतर पॅसेंजर रेल्वे गाड्या सध्या बंद असणार आहेत, असे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिले आहे.

रेल्वे मंत्रालयाने शनिवारी प्रसिद्धी पत्रकारद्वारे स्पष्ट केले की, सध्या काही विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. या गाड्या कामगार, भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि देशात इतर ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी सोडण्यात आल्या आहेत. राज्यांच्या विनंतीनुसार या रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्यांची वाहतूक अद्यापही स्थगितच ठेवण्यात आली आहे.

राज्य सरकारने नोंदणी करुन आणि विशेष सुविधांद्वारे आणलेल्या प्रवाशांनाच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रवाशाला किंवा प्रवाशांच्या ग्रुपला रेल्वे स्थानकात येण्यास परवानगी नाही. कुठल्याही रेल्वे स्टेशनवर कुठल्याही गाड्यांची तिकिट विक्री केली जात नाहीए. राज्य सरकारांनी विनंती केलेल्या व्यतिरिक्त रेल्वेकडून कुठल्याही इतर गाड्या सोडल्या जात नाहीत, या बाबींवर रेल्वे मंत्रालयाने भर दिला आहे.

इतर सर्व पॅसेंजर आणि उपनगरिय रेल्वे गाड्यांची सेवा अद्याप स्थगितच केलेली असल्याने कुणीही रेल्वे स्टेशनला जाऊ नये. त्याचबरोबर कोणीही याबाबत कुठलीही चुकीची बातमी पसरवू नये, असं आवाहनही या प्रसिद्धी पत्रकात रेल्वेनं केलं आहे.