केरळच्या मुनामबाम बंदरातून १२ जानेवारीला भारतीय स्थलांतरीतांना घेऊन निघालेली मासेमारी नौका बेपत्ता झाली आहे. १०० ते २०० भारतीय या नौकेमध्ये आहेत. न्यूझीलंडच्या दिशेने ही नौका जात असावी असा भारतीय पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. नवी दिल्ली आणि तामिळनाडूमधील नागरीक या बोटीमध्ये आहेत.

या प्रकरणी नवी दिल्लीतून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. १०० ते २०० नागरिक या बोटीमध्ये असावेत. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. स्थलातरितांनी मागे सोडलेल्या ७० बॅगा पोलिसांना सापडल्या आहेत. यात २० ओळखपत्रे आहेत असे अधिकारी व्ही.जी.रविंद्रन यांनी सांगितले. या बॅगांमध्ये कपडे आणि वस्तू भरलेल्या आहेत.

कुठल्या तरी लांबच्या प्रवासाच्या तयारीत असावेत असे या बॅगांवरुन दिसते. सध्या ही नौका आणि त्यावरील लोकांचा ठावठिकाणा लागत नसून तटरक्षक दलासह अनेक भारतीय यंत्रणा या नौकेला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यूझीलंडपर्यंत पोहोचण्यासाठी या स्थलांतरीतांना ७ हजार मैलाचा खडतर समुद्री प्रवास करावा लागणार आहे. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात वादळे सामान्य बाब आहे.