गुवाहाटी येथे विधानसभेत आसाम सरकारचे नवे जमीन धोरण आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) या मुद्यांवर चर्चेच्या मागणीवरून विधानसभाध्यक्ष हितेश गोस्वामी यांच्याबरोबर घातलेल्या वादानंतर काँग्रेसचे आमदार शेरमन अली अहमद यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. यावेळी आमदार शेरमन अली व अन्य दोन आमदारांनी भर विधासभेतच लोटांगण दिल्याची घटना घडली.

आमदार शेरमन अली अहमद यांनी आसाम सरकारच्या नव्या जमीन धोरणास बेकायदेशीर म्हणत व यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र विधानसभाध्यक्षांनी जेव्हा त्यांची चर्चेची मागणी फेटाळून लावली. मात्र आमदार अली मागणीवर ठाम राहत सभागृहाच्या मध्यभागी पोहचले होते. यावर विधासभाध्यक्ष गोस्वामी यांनी त्यांना आपल्या जागेवर जाण्यासही सांगितले होते. मात्र तरी देखील आमदार अली आपल्या भूमिकेवर कायम राहत विधासभाध्यक्षांशी वाद घालू लागले. यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. दोन्ही बाजूंच्या आमदारांमध्ये आरोपप्रत्यारोपांना व घोषणाबाजीस सुरूवात झाली. अखेर विधानसभाध्यक्षांनी आमदार अली यांना दिवसभरासाठी सभागृहातून निलंबित केले. यानंतर आमदार शेरमन अली अहमद व अन्य दोन आमदारांनी आपली मागणी करत सभागृहातच लोटांगण दिले. शेवटी त्यांना मार्शलद्वारे सभागृहाबाहेर नेण्यास सांगण्यात आले.