राज्यभरात २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी दिन म्हणून मोठ्या झोकात साजरा झाला. कवीवर्य वि.वा.शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त राज्याच्या विधीमंडळासह अनेक ठिकाणी कार्यक्रम परिसंवाद यांची रेलचेल पहायला मिळाली. विधानभवनात संगीतकार कौशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांनी मराठी अभिमान गीत सादर केलं. या सादरीकरणाला पहिल्यांदा कौतुकाची थाप मिळाली असली तरीही विधीमंडळात, कवितेततलं शेवटचं कडवं गाळल्यामुळे विरोधकांनी जोरदार गोंधळ केला.

मराठी भाषेला मिळणाऱ्या अभिजात दर्जा आणि त्यावरुन होणारं जाती-पातीचं राजकारण यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून खास फटकारे ओढले आहेत. मराठीची अस्मिता ही फक्त ठिगळं लावलेली असून या अस्मितेला जातीच्या पलिकडे नेण्याची गरज असल्याचं राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून मांडलंय. तामिळनाडू, पंजाब, गुजरात, बंगाल या राज्यातील स्त्रियांना त्यांच्या पारंपरिक वेशात उभं करुन, राज ठाकरेंनी मराठी स्त्रीला पारंपरिक साडीत प्रतिकात्मक रुपात दाखवलं आहे. मात्र या मराठी स्त्रीच्या साडीवर विविध जातींचं ढिगळं लावली आहेत. राज ठाकरेंच्या फेसबुक पेजवर नेटीझन्सनी या चित्रालाही लाईक्स, शेअर आणि कमेन्टच्या माध्यमातून आपल्या पसंतीची पावती दिलेली आहे.

भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर राज्यातलं वातावरण एकाप्रकारे गढूळ झालं होतं. खासकरुन सोशल मीडियावर अनेक लोकांनी दोन जातींमध्ये तेढ पसरवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. याच मुलाखतीत, आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर चांगलीच टीका झाली. मात्र या सर्व भांडणात मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा तोटा होत असल्याचं राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मांडलं आहे. या चित्राच्या माध्यमातून आरक्षणाच्या माध्यमातून आपापल्यात फूट पडत असल्याचा संदेश राज यांनी दिला आहे.