मोबाइल फोन चार्जिंगला लावलेला असताना त्याचा स्फोट झाल्यामुळे मलेशियातील एका सीईओला प्राण गमवावे लागले आहेत. क्रॅडल फंड या सरकारी मालकीच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष नाझरीन हसन यांच्याकडे ब्लॅकबेरी व हुआवेई हे स्मार्टफोन होते. झोपताना नाझरीन यांनी बेडरूममध्ये दोन्ही फोन चार्ज करत ठेवले होते. ओव्हरहिटिंगमुळे दोनपैकी कुठल्या तरी एका फोनचा स्फोट झाला आणि तो इतका मोठा होता की दोन्ही फोन ध्वस्त झाले, गादी जळून गेली आणि नाझही ठार झाले.

हसन यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार स्मार्टफोनचा स्फोट झाल्यानंतर त्याचे जे भाग उडाले त्यातला एक अणुकुचीदार भाग हसन यांच्या डोक्यात घुसला आणि त्याच्या आघाताने त्यांचा जीव घेतला. त्यातच आगही लागली बेडरूमपण जळाली, मात्र त्यापूर्वीच हसन गतप्राण झाले होते.
“ब्लॅकबेरी व हुआवेई असे दोन फोन त्यांच्याकडे होते. त्यापैकी कुठल्या फोनचा स्फोट झाला हे समजणं शक्य नाही. फोन चार्जिंगला लावण्यासारखी रोजची कृती महागात पडेल याची तीन मुलांचे पिता असलेल्या नाझरीन यांना कधी शंकादेखील आली नसेल,” हसन यांच्या मेहुण्यानं मलेशियन इनसाईटकडे प्रतिक्रिया व्यक्त केली.

तर सरकारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार फोनचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट तयार झाले. तो धूर नाकातोंडात गेल्यामुळे गुदमरून हसन यांचा मृत्यू झाला. मात्र, खुद्द क्रॅडल या कंपनीनं प्रसारीत केलेल्या पत्रानुसार पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये मोबाइल फोनच्या स्फोटामुळे झालेल्या जखमांना हसन बळी पडले. इंग्लंडमध्ये कायद्याची पदवी घेतलेल्या व मलेशियन सरकारसाठी आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या नाझरीन हसन यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.