नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधी यांच्याकडे एखाद्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याची क्षमता जास्त असल्याचा अनुभव मोदींच्याच एका प्रशंसकाने सांगितला आहे. साध्वी खोसला दलाल ही माहितीपट निर्माती पंतप्रधान नरेंद्र मोदींची समर्थक आहे. नरेंद्र मोदी हे स्वत: ट्विटरवर साध्वीला फॉलो करतात. मोदींनी काही दिवसांपूर्वी ‘मन की बात’ कार्यक्रमात पंजाबमधील मादक पदार्थांच्या धोक्याविषयी भाष्य केले होते. साध्वीने याच विषयासंदर्भात एक माहितीपट बनवला होता. त्यामुळे या कार्यक्रमानंतर उत्साहित झालेल्या साध्वीने माहितीपटाच्या उद्घाटनासाठी ट्विटरवून मोदींशी संपर्क साधला. मात्र, मोदींनी त्याला कोणतेही उत्तर दिले नाही. यानंतर तिने मोदींना पत्रही लिहले. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही, असे साध्वीने सांगितले.
मात्र, याबाबत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींकडून तिला आश्चर्यचकित करणारा अनुभव आला. विशेष म्हणजे तिने साधारण वर्षभरापूर्वी ट्विटरवरून राहुल यांच्यावर टीकाही केली होती. तरीही राहुल यांनी तिच्या माहितीपटाच्या उद्घाटनाला येण्याचे निमंत्रण स्विकारल्याने साध्वीला आश्चर्याचा धक्का बसला. या अनुभवानंतर राहुल गांधींकडे समोरच्याचे म्हणणे ऐकून घेण्याची क्षमता असल्याची सूचक प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.