नोटाबंदीच्या मुद्यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून ते सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोटाबंदीच्या निर्णयाची किंमत चुकवावी लागेल, अशा शब्दांत त्यांना भाजपलाच इशारा दिला आहे. इंदिरा गांधी जन्मशताब्दीनिमित्त अलाहाबाद येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नोटाबंदीमुळे सामान्य जनता सर्वाधिक त्रस्त असल्याचे त्यांनी म्हटले.
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशात अनागोंदी निर्माण झाली आहे. आता काँग्रेसला सरकारविरोधात लढण्याची गरज नाही. जनता स्वत:च सरकारला धडा शिकवेल. पंतप्रधान आणि सरकारला याची किंमत चुकवावीच लागेल, असा टोलाही लगावला.
नोटाबंदीसारखा महत्वाचा निर्णय हा एकाच व्यक्तीने घेतल्याचे दिसून येते. खूप घाईघाईत हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी याचे संभाव्य परिणामांचा विचार न करताच घेतल्याचे दिसते. या निर्णयामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. नोटाबंदीबाबत आणखी बऱ्याच गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. लोक इतके हैराण झाले आहेत की, यांची उत्तरे देता- देता सरकारला घाम फुटेल असे राहुल गांधी यांनी म्हटले.