छोटया आणि मध्यम स्वरुपांच्या व्यवसायासाठी ५९ मिनिटात १ कोटी रुपयापर्यंत कर्ज मंजूर करण्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान मोदींनी एमएसएमई सपोर्ट कार्यक्रम लाँच केला. उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी आपल्या सरकारने १२ धोरणांना मंजुरी दिल्याचे मोदी यावेळी म्हणाले. हे दिवाळी गिफ्ट असून यामुळे स्क्षूम, छोटया आणि मध्यम स्वरुपाच्या व्यवसायांना सहजतेने कर्ज उपलब्ध होईल. ज्यामुळे रोजगार वाढेल असे मोदी म्हणाले.

छोटया उद्योगांसाठी १२ ऐतिहासिक निर्णय घेतले असून हे दिवाळी गिफ्ट आहे. त्यात ५९ मिनिटात १ कोटीपर्यंत कर्ज हा महत्वाचा निर्णय आहे असे मोदी म्हणाले. जीएसटी नोंदणीकृत एमएसएमई उद्योगांना कर्जामध्ये २ टक्के सवलत मिळेल. एमएसएमई सेक्टरमुळे भारत आर्थिक दृष्टया बळकट झाला आहे असे मोदी म्हणाले.

देशातील १०० जिल्ह्यात पुढचे १०० दिवस हा कार्यक्रम चालणार आहे असे मोदी म्हणाले. देशाच्या जीडीपीमध्ये एमएसएमई सेक्टरचे ३० टक्के योगदान आहे. या सेक्टरचे देशभरात विशाल जाळे पसरले असून ६.३ कोटीपेक्षा जास्त एमएसएमई युनिट देशात कार्यरत असून ११.१ कोटी लोकांना यातून रोजगार मिळतो असे मोदींनी सांगितले.