पुढील १०० दिवसांचा कामाचा आराखडा निश्चित करून कार्यक्षम प्रशासनाद्वारे सरकारी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य देण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱयांना दिले. केंद्रीय मंत्रिमंडळाची दुसरी बैठक गुरुवारी सकाळी झाली. त्यामध्ये सरकारचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला. त्याचबरोबर केंद्र-राज्य संबंधांवर मोदींनी आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यांचा विकास देशाच्या विकासासाठी कळीचा मुद्दा असल्यामुळे राज्य सरकारकडून मांडण्यात आलेल्या विषयांना त्याचबरोबर खासदारांनी उपस्थित केलेल्या विषयांना प्राधान्य द्या, असे मोदी यांनी बैठकीत सांगितले. पुढील १०० दिवसांच्या कामाचे वेळापत्रक तयार करून प्राधान्यक्रम निश्चित करण्यासही मोदी यांनी यावेळी सांगितले.
मोदी सरकारचा दहा कलमी कार्यक्रम….
१. प्रशासकीय यंत्रणेचा विश्वास संपादित करा
२. प्रशासकीय अधिकाऱयांना अधिक स्वायत्तता देऊन नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन द्या
३. सरकारी कामकाजात पारदर्शकता ठेवा
४. लोकाभिमुख धोरणांनाच सरकारचे प्राधान्य द्या
५. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात सुधारणा
६. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते हेच प्राधान्याचे विषय
७. विविध मंत्रालयातील समन्वयासाठी व्यवस्था तयार करा
८. निर्धारित वेळेतच धोरणांची अंमलबजावणी करा
९. आर्थिक प्रश्न प्राधान्याने सोडवा
१०. सरकारी धोरणांमध्ये स्थैर्य आवश्यक