नवी दिल्ली : देशातील महत्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवणारे अभिनेते प्रकाश राज हे आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे सोशल मीडियावरही नेहमीच ट्रोल होत असतात. आता पुन्हा एकदा प्रकाश राज यांनी खळबळजनक आणि बिनधास्त वक्तव्य केले आहे. ‘मी हिंदूविरोधी नाही तर मोदी, शाह, हेगडे विरोधी आहे. माझ्या मते हे लोक हिंदू नाहीत, असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे. इंडिया टूडे या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रकाश राज म्हणाले, जे हत्यांचे समर्थन करतात, ते हिंदू असू शकत नाहीत. हे लोक मला हिंदूविरोधी ठरवतात तर मी देखील हे सांगू शकतो की, हे लोक हिंदूच नाहीत. अनंतकुमार हेगडे यांच्या संविधान बदलण्याच्या वक्तव्यावर प्रकाश राज म्हणाले, ‘चार दिवसांपूर्वी मी सिरसीमध्ये होतो. मी तेथेच स्टेजवरूनच मंत्र्यांना प्रश्न केला की, आपल्या संविधानाच्या सुरुवातीला एक प्रस्तावना असते, या प्रस्तावनेचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? माझ्या या वक्तव्यानंतर भाजपचा एक गट तेथे पोहोचला आणि त्यांनी स्टेजला गोमुत्राने साफ केले. एवढेच नाही या लोकांनी असाही प्रचार केला की, प्रकाश राज गोमांस खातात आणि गोमांस खाणाऱ्यांचे समर्थन करतात. त्यामुळे आम्ही हा स्टेज स्वच्छ केला आहे. मात्र, मी स्टेजवर बोलताना गोमांसाबाबत बोललोच नव्हतो. त्यामुळे हे लोक काहीही जन्माला घालू शकतात.’

सुप्रीम कोर्टाने पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, काही अराजकी गटाने या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला आहे. तुम्ही सत्तेत आहात आणि हा सिनेमा प्रदर्शित होणार नाही असे म्हणता. यावरुन तुम्ही अराजकतेच्या तत्वांचे समर्थन करता त्यामुळे तुम्ही आमच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात नाही का? असा सवालही प्रकाश राज यांनी उपस्थित केला.

गौरी लंकेश यांच्या हत्येवर काही लोकांना आनंद साजरा करताना मी पाहिले आहे. अशा लोकांना पंतप्रधान मोदी फॉलो करतात. या मुद्द्यावर ते गप्प का आहेत. त्यांनी अशा लोकांना थांबायला का सांगितले नाही. हीच गोष्ट माझ्या मनाला टोचत आहे. एक खरा हिंदू कोणाच्याही मरणावर आनंद साजरा करणार नाही. आमच्या पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्याला एखाद्या धर्माला संपवण्याची भाषा करू नये असे सांगायला हवे. मात्र, पंतप्रधान आपल्या मंत्र्याला असे सांगत नसतील तर तुम्ही हिंदू नाहीत असे मी म्हणू शकतो, असे अभिनेते प्रकाश राज याठिकाणी म्हणाले.