बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप, प्रत्यारोप आणि टीकांच्या फैरी झडण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे(राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यानंतर आता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. नरेंद्र मोदी हे ‘अॅक्शन’ नव्हे, तर ‘ऑक्शन’ (लिलावी) पंतप्रधान आहेत, अशा बोचऱया शब्दांत जयराम रमेश यांनी मोदींवर निशाणा साधला. पाटणा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. मोदी प्रत्येक गोष्टीचा लिलाव करीत सुटले आहेत. त्यामुळे ते आता लिलावी पंतप्रधान झाले आहेत. कधी ते आपल्या कोटाचा लिलाव करतात, तर कधी कोळसा खाणींचा लिलाव करतात. लिलावात एखाद्या वस्तूवर बोली लावावी त्याप्रमाणे पॅकेज देण्याच्या नावाखाली त्यांनी बिहारची बोली लावली. ही बिहारची थट्टा असून जनता त्यांना माफ करणार नाही, असे जयराम रमेश म्हणाले.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये नमूद करण्यात आलेल्या ९० टक्के प्रकल्पांची सुरूवात यूपीए सरकारच्या काळातच झाली आहे. त्यामुळे मोदींनी जाहीर केलेले पॅकेज जनतेची दिशाभूल करणारे असल्याचा दावा देखील यावेळी जयराम रमेश यांनी केला.
दरम्यान, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदींनी जाहीर सभेत बिहारसाठी तब्बल १.६५ लाख कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली होती. त्यावर राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यांनी मोदींची नक्कल करून या घोषणेची आणि मोदींची खिल्ली उडवली होती.