निवृत्त जवानांच्या पदकवापसीवर अप्रत्यक्ष नाराजी

 

सीमेवर संरक्षण करणाऱ्या जवानांच्या शूरतेमुळे व चारित्र्यपूर्ण वर्तनामुळे जग भारताकडे आदराने पाहते, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवरील जवानांसमवेत दिवाळी साजरी करताना काढले. लागोपाठ दुसऱ्या वर्षी ते दिवाळीत सीमेवरील जवानांसमवेत होते. त्यांनी अब्दुल हमीद यांना या वेळी श्रद्धांजली वाहिली. ‘एक पद एक निवृत्तिवेतन’ या मुद्दय़ावर मात्र त्यांनी लष्कराच्या निवृत्त जवानांनी जी पदकवापसी चालवली आहे त्यावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. जवानांचे ‘चारित्र्य व वर्तन’ ही महत्त्वाचे असते असे ते या वेळी म्हणाले. एक व्यक्ती एक निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी ‘फूल प्रूफ’ व्हावी यासाठी आम्ही समिती नेमली आहे, असा टोमणाही त्यांनी याप्रश्नी मारला. संरक्षण सामुग्रीचे उत्पादन देशांतर्गतच झाले पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.

अमृतसरमधील डोगरा स्मारकाला त्यांनी भेट दिली, २२ सप्टेंबर १९६५ रोजी या ठिकाणी भारतीय जवानांनी तेथे जोरदार लढत दिली होती. तेथे त्यांनी स्मारकाच्या ठिकाणी पुष्पचक्र वाहिले. असल उत्तर स्मारक  अमृतसर- खेमकरण रस्त्यावर वलोथाजवळ आहे, तेथे त्यांनी पुष्पचक्र वाहिले. नंतर परमवीर चक्राचे मानकरी दिवंगत अब्दुल हमीद यांना त्यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. असल उत्तर लढाई १९६५ मध्ये झाली होती, त्या वेळी अब्दुल हमीद एकांडय़ा शिलेदारासारखा लढला व त्याने शत्रूचे ३ रणगाडे नष्ट केले होते असे मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, आपल्या सैन्यदलांनी शत्रूचे ९० टक्के रणगाडे असल उत्तर लढाईत नष्ट केले होते.

जवानांना उद्देशून त्यांनी सांगितले की, मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो, ही संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. तुमचे शौर्य, समर्पण व स्वप्ने यामुळे देशाला आदराचे स्थान आहे. पण ते केवळ लष्करी वर्दीमुळे नाही, तर त्यात चारित्र्य व वर्तनही महत्त्वाचे आहे. सैनिकांशी चांगला संवाद झाला, त्यांच्यासमवेत काही काळ राहता आले याचा आनंदच आहे.’

मोदी यांनी फिरोझपूर येथील बारकी स्मृतीस्थळासही भेट दिली. ते १९६९ मध्ये बांधले आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात तेथे आपले काही जवाना धारातीर्थी पडले होते. तेथे लाल व पांढऱ्या रंगातील वालुकाश्माचा २७ फूट उंच स्तंभ उभारलेला आहे.